पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेत पहिल्यांदाच सत्तेत आलेल्या भाजपाचे शहरातील कचरा समस्येने अक्षरश: कंबरडे मोडले आहे. शहरात सर्वत्र कचऱ्याचा प्रश्न मोठा गंभीर होत चालला आहे. दररोज विरोधकांकडून सत्ताधारी भाजपा आणि प्रशासनाकडून आंदोलने होत आहेत. या कचरा कोंडीमुळे सत्ताधारी त्रस्त झाले असून पक्षनेते एकनाथ पवार आणि स्थायी सभापती विलास मडिगेरी यांनी आज शहरातील विविध भागात पाहणी दौरा केला.
यावेळी त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, मुख्य आरोग्य अधिकारी अनिल रॉय, आरोग्य अधिकारी गोफने आदी उपस्थित होते. सकाळी ६ ते ११ या वेळेत शहरातील रावेत, वाकड, डांगे चौक, पिंपळे निळख, विकासनगर किवळे, पिंपळे गुरव, सांगवी आदी भागाचा पाहणी दौरा करण्यात आला. घरोघरचा कचरा संकलन करणे व वाहतूक करणे या कामासंदर्भात नव्याने नियुक्त केलेल्या ठेकेदारांच्या कामाची पाहणी पदाधिकाऱ्यांनी केली. मात्र सर्वत्र कचऱ्याचे ढिग दिसून आल्याने संबंधित ठेकेदार, अधिकाऱ्यांना तातडीनं यावर कार्यवाही करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने १ जुलैपासून नवीन कंत्राटदारांमार्फत कचरा संकलन आणि वहनाचे काम सुरु केले आहे. शहरातील कचरा संकलन आणि वाहून नेण्याचे उत्तर भागाचे काम बी.व्ही.जी इंडिया लिमिटेडयांना देण्यात आले. तर, दक्षिण भागाचे काम ए.जी. एन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स यांना देण्यात आले आहे. दोन्ही कंत्राटदारांना आठ वर्षांसाठी हे काम देण्यात आले आहे. कचरा संकलन आणि वहन या कामाचा बोजवारा उडाला आहे. ‘घरोघरचा कचरा संकलित केला जात नाही. गृहनिर्माण सोसाट्यांमधील कचरा उचलण्यावरुन वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. कचरा कुंडीच्या बाहेर पडलेला कचरा उचलला जात नाही. केवळ कुंडीतीलच कचरा उचलला जात आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग साचल्याची नगरसेवकांची तक्रार आहे.
विरोधकांकडून होत असलेल्या दररोजच्या आंदोलनानंतर पक्षनेते आणि स्थायी सभापतींनीच शहरातील विविध भागाचा पाहणी दौरा केला आहे. यावेळी त्यांना जागोजागी कचऱ्याचे दर्शन घडलयं. दरम्यान, संबधितांना त्यांनी कारवाईच्या सुचना केल्या आहेत. आता सत्ताधाऱ्यांच्या सूचनांचा आणि या दौऱ्याचा किती फायदा होणार, हे येत्या दोन-चार दिवसांत स्पष्ट होईलच.






















Join Our Whatsapp Group