पिंपरी (Pclive7.com):- लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा पराभव झाला. त्यानतंर आता पार्थ पवार आगामी विधानसभा निवडणूक लढवणार का, याबाबतची चर्चा सुरू झाली. याबाबत पिंपरी चिंचवडमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘विधानसभा निवडणूक लढवायची की नाही, याचा निर्णय पार्थ स्वत: घेईल. हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही आमच्या पक्षात बळजबरी करत नाही,’ असं म्हणत अजित पवार यांनी पार्थच्या विधानसभा लढवण्याबाबत थेट भाष्य करणं टाळलं आहे.
‘लोकसभेतील पराभव आम्ही स्वीकारला असून आम्हाला जनतेचा कौल मान्य आहे. आता विधानसभेच्या तयारी सुरू झाली आहे,’ असंही अजित पवार म्हणाले. ‘विधानसभा जागा वाटपाबाबत आघाडीत फार काही अडचण येणार नाही. सकारात्मक चर्चा झाली आहे. काही जागांची अदला-बदल होईल,’ अशी शक्यता अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.