पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. स्वतंत्र पोलीस आयुक्तालय होऊन देखील गुन्ह्याचे प्रमाण वाढले आहे. खून, अपहरण, गाड्यांती तोडफोड, दरोडे, महिलांवरील अत्याचार यासारख्या घटना नित्याच्याच झाल्या अाहेत. आज पिंपळे सौदागर मधील एका अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी जबाबदारी स्विकारून राजीनामा द्यावा. तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय बंद करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांना निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते दत्ता साने, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, महिला अध्यक्ष वैशाली काळभोर, नगरसेवक नाना काटे, राजू मिसाळ, मयूर कलाटे, रोहित काटे, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर, शितल काटे, माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ, लाला चिंचवडे, प्रदीप गायकवाड आदी उपस्थित होते.
पोलिस आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड मधील पिंपळे सौदागर भागातील एका अडीच वर्षांच्या चिमुकलीवर नराधमाने अत्याचार करून तिचा खून केला असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पिंपरी चिंचवड शहरात पोलीस आयुक्त झाल्यापासून सर्व प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. त्यामुळे पोलिसांना जर नागरिकांची सुरक्षितता ठेवण्यात अपयश येत असेल, गुंडगिरी प्रवृत्तीच्या व समाजाला विकृती प्रकाराच्या गुन्ह्यातून सावरता येत नसेल. आणि अशा लोकांवर पोलिसांनी पोलिसांची दहशत न ठेवता शहरात गुन्हेगार मोकाट फिरत असतील तर याची जबाबदारी गृहमंत्रालयाची व पोलिसांची आहे.
शहराला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना पोलीस आयुक्तालय झाल्यापासून घडल्या आहेत. या घटनेतील आरोपींना पकडून फाशीची शिक्षा झाली पाहिजे. देशात अनेक ठिकाणी मुली व महिलांवर अशा प्रकारच्या अत्याचाराला केंद्रीय गृह मंत्रालय, राज्य गृह मंत्रालय, राज्यातील सत्ताधारी आणि पोलीस प्रशासन हेच जबाबदार आहेत. मुळातच कोणाचाही वचक प्रशासनावर राहिला नाही. सत्ताधारी सत्तेत मश्गुल व पैशाच्या मस्तीत आहेत. त्यामुळे अशाप्रकारच्या गुन्हेगारांना व विकृत प्रवृत्तींना शहरात अभय मिळत आहे, हे आजच्या घटनेने सिद्ध झाले आहे.
त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. ज्या ज्या आमदारांनी पोलीस आयुक्तालय आणले म्हणून गाजावाजा करत श्रेय घेतले. त्यांच्यावर देखील अशा प्रकारच्या गुन्ह्यांची जबाबदारी येत आहे. अशा घटनांचे व गुन्ह्यांचे श्रेयसुद्धा त्यांनाच जाते. कारण वाईट गुन्हे घडू नयेत म्हणून आयुक्तालय झाले असले तरी, वाईट गुन्ह्यांचे श्रेय त्या आमदारांना दिले पाहिजे. पोलीस आयुक्तालयाकडून जर शहरातील गुन्हे थांबणार नसतील, विकृत प्रवृत्तीच्या घटना थांबणार नसतील तर शहरातील पोलीस आयुक्तालय बंद करावे व सर्व पोलीस स्टेशन बंद करावीत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.





















Join Our Whatsapp Group