पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जीवनवाहिनी असलेल्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे रुग्णालयाची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे आगामी २१ दिवसात महापालिका प्रशासनाने रुग्णालयात नवीन डॉक्टर्स आणि नर्सची भरती करावी, अशी मागणी शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी केली आहे. यासंदर्भात युवराज दाखले यांनी आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्याकडे मागणी केली आहे.
यावेळी बोलताना दाखले म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या ३० लाखाच्या जवळपास पोहचली आहे. दिवसेंदिवस रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत असताना मात्र महापालिकेचे मुख्य रुग्णालय असलेल्या वायसीएम रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांची संख्या मात्र तुलनेने खूप कमी आहे. त्यामुळे या वाढत्या रुग्णांचा ताण या कर्मचाऱ्यांवर येत असल्यामुळे त्यांनाही मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
या सर्व बाबींचा विचार करून रुग्णालयातील तज्ञ डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ केल्यास इतर कर्मचाऱ्यांवर येणारा अतिरिक्त ताण कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर रुग्णांनाही चांगली सेवा उपलब्ध करून देता येईल. याचा गांभीर्याने विचार करून आगामी २१ दिवसांच्या आत रुग्णालयात नवीन कर्मचाऱ्यांची भरती करण्यात यावी. अन्यथा यासंदर्भात शिवशाही व्यापारी संघटनेच्या वतीने मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा दाखले यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.






















Join Our Whatsapp Group