पिंपरी (Pclive7.com):- लोकांच्या सतत संपर्कात होतो. नागरिकांची कायम ये-जा माझ्याकडे चालू होती. पाच वर्षात नागरिकांची गर्दी कमी झालेली नव्हती. लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार यांचं काम मी प्रामाणिकपणे केलं होतं. मात्र त्याचीच बक्षीस मला राष्ट्रवादीकडून मिळालं. लोकांच्या जोरावर राष्ट्रवादी मला उमेदवार देईल असं वाटलं होतं. कालपर्यंत अपेक्षा होती, मात्र आजचा निर्णय ऐकून मी स्वतः चकित झालो. मात्र आता थांबणार नाही उद्या (शुक्रवारी) पिंपरी विधानसभेतून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे माजी आमदार आण्णा बनसोडे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
पिंपरी राखीव मतदारसंघातून उद्या (शुक्रवारी) हजारो समर्थकांसह अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे पिंपरीचे माजी आमदार आण्णा बनसोडे यांनी जाहिर केले. चिंचवड स्टेशन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, मागील विधानसभा निवडणुकीत मी अवघ्या दोन हजार मतांनी पराभूत झालो होतो. त्यानंतर देखील सलग पाच वर्ष मी मतदारांशी संपर्कात राहून माझे काम सुरु ठेवले आहे. या निवडणुकीत देखील मला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची उमेदवारी मिळण्याची खात्री होती. परंतू, मला का डावलले? याबाबत मीच स्वत: चकीत झालो आहे. ‘माझे काय चुकले’ हाच प्रश्न मी राष्ट्रवादीच्या पक्षनेतृत्वास विचारत आहे, असे माजी आमदार आण्णा बनसोडे यांनी सांगितले.
शुक्रवारी सकाळी 10 वाजता आकुर्डी खंडोबामाळ चौकातून आपल्या हजारो समर्थकांसह अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्यास जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत मी पार्थ पवारांचे काम प्रामाणिकपणे केले होते. त्याचे बक्षीस म्हणूनच मला डावलले काय? असे वाटते. या विधानसभा निवडणुकीत माझ्याबरोबर पक्षातील व विरोधी पक्षातीलही अनेक नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार आहेत. त्यांच्या पाठींब्यावरच मी निवडणुकीस उभा राहत आहे. आपण माघार घेणार नाही ना? असे विचारले असता समजावण्याची वेळ आता गेली आहे. मी अर्ज भरणार आहे, कोण सक्षम हे कळेलच. मी अजूनही ग्रासरूटलाच काम करीत आहे. मला शंभर टक्के विजयाची खात्री आहे. आपल्याबरोबर किती नगरसेवक आहेत असे विचारले असता, ते उद्या तुम्हाला रॅलीत दिसेल, असेही आण्णा बनसोडे म्हणाले.