पिंपरी (Pclive7.com):- भोसरी विधानसभेच्या रिंगणात माजी आमदार विलास लांडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत महायुतीपुढे मोठं आव्हान निर्माण केलयं. राष्ट्रवादीनेही त्यांना पाठींबा देत लांडे हे पुरस्कृत उमेदवार असल्याचे जाहीर केलयं. त्यामुळे भोसरी विधानसभेच्या आखाड्यात महायुतीचे महेश लांडगे आणि राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार विलास लांडे अशी लढत पहायला मिळणार आहे.
भोसरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीची उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. माजी आमदार विलास लांडे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्यात उमेदवारीसाठी चुरस निर्माण झाली होती. मात्र विलास लांडे यांनी अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. त्याला अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेल्या दत्ता साने आणि जालिंदर शिंदे यांनी पाठींबा दर्शविला आहे. हे दोघेही आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत. दरम्यान राष्ट्रवादीनेही विलास लांडे यांना पाठींबा देत पुरस्कृत उमेदवार असल्याचे जाहीर केले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली.