पिंपरी (Pclive7.com):- भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक शैलेश मोरे हे पिंपरी विधानसभेतून प्रबळ दावेदार होते. त्यांनी मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणी करीत वातावरण भाजपमय केले होते. मात्र, भाजप-शिवसेना पक्षाची महायुती झाली, त्यात पिंपरीची जागा सेनेला गेली. त्यानंतर पक्षादेश येताच शैलेश मोरे यांनी आपली बंडखोरी रोखत पक्षाशी आपण ‘एकनिष्ठ’ असल्याचे दाखवून दिले. पक्षादेश येताच निवडणुक रिंगणातून आपण माघार घेतल्याचे त्यांनी पीसी लाईव्ह न्यूजशी बोलताना सांगितले.
महायुतीकडून शिवसेनेच्या उमेदवारास उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराचे काम करा. आपली तगमग समजू शकतो परंतु, आगामी काळात आपणाला योग्य ठिकाणी योग्य संधी दिली जाईल, असा आदेश येताच नगरसेवक मोरे यांनी आधी लगीन महायुतीच, या युक्तीप्रमाणे पक्षाची आज्ञा शिरोधार्य मानीत, आपली तलवार म्यान केली.
याबाबत नगरसेवक शैलेश मोरे आपली प्रतिक्रीया देताना म्हणाले की, मला पक्षनिष्ठा महत्वाची वाटते. पक्षाने आदेश देताच मी माझे काम थांबवले व या निवडणुकीतून माघार घेतली. मात्र, काहींना पक्षाने सर्व काही दिले, तरी ते पक्ष आदेशाला केराची टोपली दाखवत, अपक्ष का होईना आपले बळ आजमावताना दिसत आहेत. राजकारणात पक्ष, निष्ठा, विकास यापेक्षा स्वतःची सोय महत्त्वाची असते, हेच यांच्या या वृत्तीतून स्पष्ट होते. सर्वत्र माझाच झेंडा फडकला पाहिजे, हा हट्ट धरून कोणत्याही स्तराला जाण्याचा पराक्रम म्हणजे स्वाभिमान का? असे असेल तर हा तर मोठा विनोदच असल्याचे मोरे शेवटी बोलताना म्हणाले.






















Join Our Whatsapp Group