पिंपरी (Pclive7.com):- भोसरी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, रासप, रयत क्रांती शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम संघटना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांना विविध संस्था संघटनांनी पाठिंबा जाहिर केला आहे. जीवनविद्या मिशन, राजपूत समाज संघठन पिंपरी चिंचवड, अविरत श्रमदान एक पाऊल भावी पिढीसाठी, परशुराम युवा प्रतिष्ठान आदी संस्थांचा त्यात समावेश आहे. महेश लांडगे हे राष्ट्र व समाजहिताचे काम प्रभावीपणे करत असल्याने हा पाठिंबा जाहिर करण्यात आल्याचे या संस्थांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
जीवनविद्या मिशनने आमदार महेश लांडगे यांना सद्गुरुंचे आशीर्वाद आणि शुभेच्छा पाठविल्या आहेत. हे जग सुखी व्हावे व हे राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे या दिव्य संकल्पासाठी सद्गुरु श्री वामनराव पै प्रणित जीवनविद्या मिशन संस्थेचे सामाजिक व राष्ट्रीय कार्य गेल्या 60 वर्षापासून सुरु आहे. आजच्या एकविसाव्या शतकात विज्ञानाने प्रगती साधली आहे. या विज्ञाननिष्ठ विकासाला विवेकाची जोड दिली तरच हा विकास ख-या अर्थाने साध्य होईल, असे सद्गुरु म्हणत. त्याच विचाराने महेश लांडगे हे पुढे जात आहेत. विकासाला सद्सद्विवेकबुद्धीची जोड देऊन सर्वच समाजाची प्रगती साधण्याचा प्रयत्न ते करत आहेत. सद्गुरु श्री वामनराव पै प्रणित जीवनविद्या मिशनचा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली पुण्यस्मरण सोहळा दोन वर्षापूर्वी आमदार लांडगे यांनी साजरा केला. आमच्या लाखो नामधारकांनी व हजारो भोसरीकरांनी हा दिव्य, पवित्र व पावन सोहळा अनुभवला. सद्गुरुंचे सुपुत्र श्री प्रल्हाद वामनराव पै यांना आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी चिंचवड महापालिका व आळंदी नगर परिषदेकडून सन्मानपत्र व मानचिन्ह देऊन सन्मानित केले. याचा आम्हाला विशेष आनंद झाला. भोसरी परिसरातील जनसामान्यांचा सर्वांगिण विकास व्हावा या आमदार लांडगे यांच्या शुद्ध हेतूला आम्ही सदैव खंबीरपणे साथ देऊ. महेशदादा यांना येत्या विधानसभेत भरघोस यश प्राप्त होवो, अशा सदिच्छा जीवनविद्या मिशनने दिल्या आहेत.
राजपूत समाज संघठन पिंपरी चिंचवड या संस्थेचे अध्यक्ष शिवकुमारसिंह बायस तसेच सचिव श्रीराम परदेशी यांनी संघटनेचा पाठिंबा लांडगे यांना जाहिर केला आहे. समस्त राजपूत संघठन पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने ज्ञानराज मंगल कार्यालय, चिंबळी फाटा येथे हजारो समाजबांधवांच्या उपस्थितीत नुकताच संकल्प मेळावा घेण्यात आला. यावेळी महापौर राहुल जाधव, सामाजिक कार्यकर्ते कार्तिक लांडगे आदी उपस्थित होते. राजपूत समाज राष्ट्रहित व समाजहितासाठी इतिहास काळापासून कार्यरत आहे. आमदार लांडगे हे राष्ट्र व समाजहिताचे काम प्रभावीपणे करत असल्याने त्यांना पाठिंबा देत असल्याचे अध्यक्ष बायस व सचिव परदेशी यांनी सांगितले.
अविरत श्रमदान एक पाऊल पुढील पिढीसाठी या संस्थेनेही आमदार महेश लांडगे यांना पाठिंबा जाहिर केला आहे. आमदार लांडगे यांनी इंद्रायणी सुधार, पर्यावरणपूरक उद्याने, दिघी येथील दत्त गडावर केलेले वृक्षारोपण या कामगिरीची दखल घेऊन हा पाठिंबा जाहिर करण्यात आल्याचे अध्यक्ष सुवर्णा भोंगळे यांनी म्हटले आहे. या पत्रावर डॉ.सारीका लोंढे, संध्यालक्ष्मी पै, दिगंबर जोशी, ॲड. सुनील कदम, प्रकाश चौधरी, जितेंद्र माळी, संतोष शिर्के, डॉ. आनंद पिसे, दत्तात्रय नरवडे, विश्वजित डोंगरे, संदेश मोहिते, विनायक पवार यांच्या सह्या आहेत.
नामस्मरण भजनी मंडळाचे अध्यक्ष काळूराम देवकर व परशुराम युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश नाईक तसेच पिंपरी चिंचवड लघुउद्योजक संघटना, पिंपरी चिंचवड बार असोशिएशन, शिक्षक संघटना, पीएमपीएमएल इंटक एम्प्लॉईज संघटना, गुजराथी समाज, मारवाडी समाजाचे अध्यक्ष संजय पटनी, बारी समाज, साऊथ इंडियन असोशिएशन, बांधकाम कामगार सेना, सिंधूदुर्ग जिल्हा लोकसेवा प्रतिष्ठान, खान्देशी बहुउद्देशीय युवा मंच, भारतरत्न मौलाना अबूल कलाम आझाद समिती, स्वाभिमानी कामगार संघटना, उत्तर भारतीय मित्र मंडळ, शिवगर्जना कामगार संघटना, स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांनीही भोसरी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, रासप, रयत क्रांती शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम संघटना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांना पत्राव्दारे पाठिंबा जाहिर केला आहे.