पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ गटनेते पदावरून हकालपट्टी केल्यानंतर अजित पवार एकटे पडतील असं वाटत असतानांच आता अजित पवार समर्थकांकडून त्यांच्या निर्णयाचं स्वागत करणारे फ्लेक्स पिंपरी चिंचवड शहरात झळकत आहेत. दरम्यान ‘आम्ही ८० वर्षाच्या योध्या सोबत’ असल्याचे सांगणारे फ्लेक्स देखील शरद पवार यांच्या समर्थनार्थ लागले आहेत. त्यामुळे हे शहर राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या उभ्या फुटीचं दर्शनच होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
सत्ता स्थापनेवरून राज्यात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दररोज नवनवीन नाट्यमय घडामोडी घडत आहेत. भाजपाला दिलेल्या पाठींब्यावरून अजित पवार एकाकी पडत असल्याचे चित्र आहे. म्हणूनच पक्षांतर्गत वाढत चाललेला रोष शमविण्यासाठी स्वतः अजित पवार यांनीच आपल्या समर्थकांना अशी पोस्टरबाजी करण्याचा सल्ला दिला असेल का? याची चर्चा सध्या सुरू आहे. पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी शहरभर अशी फ्लेक्सबाजी करत अजित पवारांचं नेतृत्व आणि निर्णय मान्य केल्याचा ‘संदेश’ देण्याचा प्रयत्न करत अजित पवारांचं समर्थन केले आहे.
तर पिंपळे सौदागरमध्येही शरद पवार यांच्या समर्थनासाठी फ्लेक्स लागलेत. ‘आम्ही ८० वर्षाच्या योध्या सोबत’ असं सांगत शरद पवारांना पाठींबा दर्शविण्यात आलायं. सुनिल काटे, संतोष हांडे, गणेश कापसे व मित्र परिवाराच्यावतीने हे फ्लेक्स लावण्यात आलेत.
दरम्यान, या फ्लेक्सबाजी बाबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांना विचारलं असता शहरात सुरू असलेल्या फ्लेक्सबाजी बाबत आपल्याला काहीच माहीत नाही. फ्लेक्स लावून कुणी पवार साहेब किंवा अजितदादांचे समर्थन करत असेल तर हा त्यांचा वैयक्तीक विचार असेल. तर आपणही सध्या वेट अँण्ड वॉचच्या भूमिकेतच असल्याचे सांगत त्यांनी राष्ट्रवादीतील दुफळीकडे दुर्लक्ष केले आहे.