पिंपरी (Pclive7.com):- दापोडी येथे ड्रनेज लाईनच्या खड्ड्यात अडकलेल्या मजूर कामगारांना वाचविताना फायरमन विशाल जाधव यांना आपले प्राण गमवावे लागले. महापालिकेच्या अग्निशामक विभागात सुमारे सात वर्षांपासून कार्यरत असलेले शहिद जाधव हे त्यांच्या कुटुंबातील कर्ता पुरूष होते. त्यामुळे त्यांचे कुटुंब निराधार झाले असून, उदरनिर्वाहाचा प्रश्न या कुटुंबासमोर आहे. त्यांच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महापालिकेतील अंशदानीत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांनी या कुटुंबाला मदतीचा हात देत त्यांच्या वेतनातील काही रक्कम देत अर्थसाह्य उपलब्ध होण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
महापालिकेच्या ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य विभागाचे कर्मचारी अमित राजाराम जाधव व महापालिकेच्या मुख्य कार्यालयातील अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी योगेश पांडुरंग रसाळ या दोन कर्मचाऱ्यांनी जाधव कुटुंबीयांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.
शहिद विशाल जाधव यांच्या मागे पत्नी, दोन वर्षाची मुलगी, आई-वडील, एक विवाहित बहिण व एक अविवाहित लहान भाऊ आहे. घरातील कर्ता पुरूष असल्याने या कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती. सुमारे सात वर्षांपूर्वी विशाल जाधव महापालिकेच्या सेवेत रुजू झाले होते. अंशदान निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत त्यांचा समावशे होता. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना स्थिर निवृत्ती वेतन मिळणे शक्य होणार नाही. तसेच घरात कर्ता पुरूष नसल्याने या कुटुंबाची वाताहत होऊ शकते. अस्थिर निवृत्ती वेतनातून जाधव कुटुंबीयांना त्यांचा उदरनिर्वाह करणे अशक्य होणार आहे. त्यामुळे त्यांना मदतीची गरज आहे. ही परिस्थिती जाणून घेत महापालिकेचे कर्मचारी अमित जाधव व योगेश रसाळ यांनी त्यांच्या वेतनातून काही रक्कम जाधव कुटुंबियाना मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार डिसेंबर महिन्यात होणाऱ्या पगारातून एक पूर्ण दिवसाच्या पगाराची रक्कम देण्यात येणार आहे. ही रक्कम महापालिका आयुक्त यांनी पगारातून कपात करून घेऊन जाधव कुटुंबीयांना द्यावी, असे अमित जाधव व योगेश रसाळ यांनी निवेदनात नमूद केले आहे.





















Join Our Whatsapp Group