पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचा जनता संपर्क विभाग कार्यरत आहे. लाखो रूपयांचा पगार तेथील कर्मचाऱ्यांनी दिला जातो. मात्र असे असताना देखील दरमहिना तब्बल ७० हजार रूपयांची उधळपट्टी करत महापालिकेच्या कामांच्या प्रसिध्दीसाठी स्वतंत्र सोशल मिडीया एक्सपर्टची नियुक्ती करण्यात आली आहे. आजच्या स्थायी समितीच्या बैठकीत ही नियुक्ती झाली असून ‘तो’ व्यक्ती भारतीय जनता पार्टीचा सक्रीय पदाधिकारी असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राष्ट्रवादीचे सदस्य आणि शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी या नियुक्तीला विरोध दर्शविला मात्र सत्ताधारी भाजपाने बहुमताच्या जोरावर हा विषय मंजूर केला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज पार झाली. विलास मडिगेरी सभेच्या अध्यक्षस्थानी होते.
पिंपरी महापालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांच्या कामकाजांसाठी सिटी ट्रान्फॉर्मेशन ऑफीस स्थापन करण्यात आले आहे. या कार्यालयामार्फत सोशल मीडिया कॅम्पेन राबविण्यात येणार आहे. शहराच्या विकासात नागरिकांना अंतर्भूत करून घेणे, नागरिकांची, तज्ज्ञांची मते जाणून घेऊन सर्वेक्षण करणे आदी कामांचा समावेश आहे. सोशल मीडियाचे कामकाज अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी ‘सोशल मिडीया एक्सपर्ट’ म्हणून अमोल देशपांडे यांची नेमणूक करण्याचा प्रस्ताव दीड वर्षांपूर्वी स्थायी समितीपुढे आला होता. मात्र सदस्यांच्या विरोधामुळे तो विषय बारगळला होता. आज पुन्हा तो विषय स्थायीपुढे मंजूरीसाठी आला होता. ६ महिन्यांसाठी या पदाची नियुक्ती करण्यात येणार असून दर महिन्याला तब्बल ७० हजार रुपये एवढे मानधन त्यांना देण्यात येणार आहे. याला राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी विरोध केला. मात्र बहुमताच्या जोरावर भाजपाने हा विषय मंजूर केला.
दरम्यान, शिवसेना गटनेते राहुल कलाटे म्हणाले की, ‘सोशल मिडीया एक्सपर्ट’पदी नेमलेले अमोल देशपांडे भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. भाजप नेत्यांचे सोशल मीडियाचे ते काम करतात. नेत्यांचे फोटो शेअर करतात. याबाबतची छायाचित्रे आयुक्तांना देखील दाखविली. दीड वर्षांपूर्वीचा हा प्रस्ताव आहे. त्यामुळे त्याला आम्ही विरोध केला. या नियुक्तीला आयुक्त देखील अनुकूल नव्हते. परंतु, भाजपाने तो मंजूर केला. महिन्याला ७० हजार रुपयांची उधळपट्टी त्यावर केली जाणार आहे. लवकरच या विषयाची तक्रार राज्य सरकारकडे करणार आहे.





















Join Our Whatsapp Group