पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीमधील टक्केवारी वरून बरेच ‘नाट्य’ गेल्या बैठकीत घडले होते. विश्वासात घेत नसून मनमानी कारभार करण्यावरून सभापती विलास मडेगिरी यांचा सदस्यांनी चांगलाच घाम काढला होता. मात्र ‘त्या’ नाट्यावरती आजच्या प्री-मिटींगमध्ये पडदा पडला. आता कोणालाच व्हिआयपी ट्रिटमेंट (अधिकचे ‘व्हिटँमिन एम’) मिळणार नाही असं ठरल्यामुळेच ‘त्या’ टक्केवारीचे ‘नाट्य’ अखेर संपले असल्याची माहिती एका सदस्यांने नाव न प्रसिध्द करण्याच्या अटीवर दिली. म्हणूनच आजच्या बैठकीत कोणत्याही बड्या वादाशिवाय तब्बल ४० कोटींच्या खर्चास मंजूरीही देण्यात आली. आज झालेल्या स्थायी समितीच्या अध्यक्षस्थानी विलास मडेगिरी होते.
राज्यातील सत्ता बदलाचे परिणाम पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कारभारात पहायला सध्या मिळत आहे. ‘मलईदार’ समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीत देखील त्याचे पडसाद उमटत होते. गेल्या आठवड्यात झालेल्या स्थायीच्या बैठकीत टक्केवारीचा ‘भांडाफोड’ करण्याचा इशाराच सदस्यांनी केला होता. मात्र त्यामागचं नेमकं कारण समोर आलं आहे. स्थायीत इतर सदस्यांना ‘व्हिटँमिन एम’चे समान वाटप होत नव्हते. ठराविक सदस्यांनाच व्हिआयपी (अधिकचे ‘व्हिटँमिन एम’) दिले जात होते. म्हणूनच काही सदस्यांनी सभापतींचा हा ‘डाव’ हाणून पाडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आजच्या प्री-मिटींगमध्येच या सुरू असलेल्या उद्योगाचा उलघडा झाला. सत्ताधारी भाजपाच्या काही सदस्यांना समान ‘व्हिटँमिन एम’ मिळत नव्हते. हे कळताच ते देखील आक्रमक झाले. मग काय व्हिआयपी सदस्यांचा भांडाफोड झाला. अखेर ‘सेटलमेंट’ झाली अन् सर्वांना समान ‘व्हिटँमिन एम’ देण्याचा निर्णय एकमताने झाला. अखेर सभापतींनी सुरू केलेल्या सदस्यांच्या या व्हिआयपी ट्रिटमेंटचा शेवट झाला आणि स्थायीचा कारभार पुन्हा गुण्या गोविंदाने सुरू करण्याचा निर्णय झाला.
त्यानंतर आजच्या बैठकीत एकूण ३९ कोटी ५७ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. ६ मधील चौकाचे सुशोभिकरण करणेकामी येणाऱ्या ३६ लाख ६८ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील संगणकाकरिता २५० नग मायक्रोसॉफ्ट लायसन्स खरेदीकामी येणाऱ्या ५० लाख ९५ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रजिमा-३१, बिर्ला हास्पीटल रस्त्याचे आवश्यक ठिकाणी पॅचवर्क पद्धतीने डांबरीकरण करणेकामी येणाऱ्या ९१ लाख ३० हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील लॉण्ड्री उपकरणाचा वापर करून मनपा दवाखाना/रुग्णालयातील लिनन (कपडे) धुलाई करणेकामी येणाऱ्या २ कोटी १० लाख ६४ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.१६ मध्ये किवळे व मामुर्डी येथील नाला बांधणे व अनुषंगिक कामे करणेकामी येणा-या ५५ लाख ७८ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. पिंपरी चिंचवड शहरातील पाणी नमुने त्रयस्त संस्थे मार्फत तपासणी करुन घेणेकामी येणा-या २८ लाख ३६ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. ९ मधील नाल्यांचे स्थापत्य विषयक कामे करणे व सुशोभिकरण करणेकामी येणा-या ६७ लाख २५ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
तसेच रावेत येथील महामंडळाच्या हद्दीतील जागा १२.०० मी. रुंद रस्त्याकरीता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ताब्यात देणेबाबतची सममूल्य एकुण ७ कोटी १९ लाख midc, पुणे यांना देणेकामी खर्चास मंजूरी देणेत आली. पिंपरी चिंचवड शहरासाठी भविष्यातील लोकसंख्या अनुषंगाने/ शासन निर्णय व शुद्धीपत्रक क्र.बिसिंआ २०१८ (३९१/१८) / सिंव्य (धो) मंत्रालय, दिनांक २४/११/२०१८ अनन्वे भामा आसखेड धरणातुन ६०.७९० द.ल.घ.मी प्रतिदिन पाणी कोटा मंजूर झाला आहे. येणाऱ्या र.रु.१०.०० कोटी अदा करणेस मान्यता देण्यात आली. पिंपरी चिंचवड शहरातील मुख्य रस्ते यांत्रिकी पद्धीतीने साफसफाई कामकाज ६ महिन्यांकरीता करणेकामी येणा-या १ कोटी ५ लाख ९४ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. फ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत नाल्यातील अस्तित्वात असलेल्या प्रभाग क्र.१ चिखली येथील पाटीलनगर व चिखली गावठाण परिसरात सन २०१९-२० करीता प्रभाग क्र.१८ मधील परिसरात जलनि:सारण नलिका रस्त्यावर स्थलांतरीत करणेकामी येणा-या १ कोटी १६ लाख ८१ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.





















Join Our Whatsapp Group