पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या माध्यमातून महापालिकेतील कर्मचार्यांचे विविध प्रश्न सोडविण्यात गेल्या १५ वर्षात यश मिळाले. अधिकारी, कर्मचार्यांसाठी सुरवातीला धन्वंतरी स्वास्थ्य योजना राबविली. आता वैद्यकीय विमा योजना राबविली जाणार आहे. कर्मचार्यांसाठी सातवा वेतन आयोग लागू केला. कामगार भवनाची उभारणी केली जाणार आहे, अशी माहिती बबनराव झिंजुर्डे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघ निवडणुकीसाठी येत्या शनिवारी (दि. ११) सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या स्व. शंकर (आण्णा) गावडे कर्मचारी महासंघ पॅनलच्या वतीने नुकतीच पत्रकार परिषद घेण्यात आली. त्याप्रसंगी पॅनलप्रमुख बबनराव झिंजुर्डे यांनी ही माहिती दिली. आमचे पॅनल बहुमताने निवडून येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. महानगपालिका कर्मचारी महासंघाची १८ जुलै २०१९ च्या औद्योगिक न्यायालयाच्या निर्णयानुसार १९ वर्षात पहिल्यांदाच गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक होत असून कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी महासंघाने केलेल्या कामांमुळे कर्मचारी आम्हाला विजयी करतील.
बबनराव झिंजुर्डे म्हणाले, कोणत्याही संस्थेच्या निवडणुका होतात त्याचा खर्च त्या संस्थेच्या खात्यातून केला जातो. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ते पदाधिकारी काळजीवाहू म्हणून काम पाहतात. सर्व निवडणुकांमध्ये मतदार/सभासद नोंद यादी असते तीच ग्राहय धरली जाते. संस्थेचे आर्थिक व्यवहार प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत स्थगित केले जातात. या कायदेशीर बाबींना विरोधक प्रशासक नेमला, भ्रष्टाचार झाला असा चुकीचा आरोप करीत आहेत. सन २०१८-१९ पर्यंतचे कर्मचारी महासंघाचे लेखा परिक्षण झाले आहे. त्यात कोणतेही आक्षेप नाहीत. विरोधकांनी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे असून ते आम्ही फेटाळत आहोत.