
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयटूआर अंतर्गत प्राप्त झालेल्या जमिनीवर महापालिकेची नवीन प्रशासकीय इमारत उभी केली जाणार आहे. या इमारतीची २४७ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही इमारत पुढील पन्नास वर्षांचा विचार करून बांधणे अपेक्षित आहे. शहरातील प्रमुख राजकीय पक्षांच्या व्यक्तींसह सामाजिक कार्यकर्ते, शहराच्या जडणघडणीत योगदान दिलेल्या व्यक्तींचा यामध्ये विचार होणे अपेक्षित होते. मात्र महापालिकेत सध्या सत्ताधारी असलेल्या काही ठराविक नेत्यांच्या दबावाखाली येऊन हा विषय मनमानी पद्धतीने रेटून नेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे आयुक्तांनी केलेल्या घाईगडबडीमुळे समोर आले आहे. त्यामुळे या नवीन इमारतीची निविदा प्रक्रिया तात्काळ थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिला आहे.
यासंदर्भात संजोग वाघेरे पाटील यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेची नविन इमारत ही शहराच्या शिरपेचात तुरा रोवणारी ठरावी. ही इमारत सर्वसुविधायुक्त असावी तसेच इमारतीमध्ये सर्व गोष्टी प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने योग्य पद्धतीने असाव्यात अशी मागणी केलेली आहे. याशिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी या इमारतीचे सादरीकरण करावे आणि नंतरच निर्णय घ्यावा, अशा सूचनाही आयुक्तांना दिलेल्या आहेत. असे असतानाही उमुख्यमंत्र्यांचा आदेश डावलून स्थानिक पदाधिकाऱ्यांना डावलून केवळ सत्ताधार्यांच्या मनमानी पद्धतीने आयुक्तांकडून पावले उचली जात आहेत. त्यामुळे या इमारतीबाबत आर्थिक हितसंबंधासाठी घाई चालविली आहे असा आरोप संजोग वाघेरे पाटील यांनी केला आहे.
या इमारतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज,अण्णासाहेब मगर यांचे पुतळे उभे करावेत, अशीही राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मागणी होती. मात्र कोणताही बदल न करता या इमारतीचे सादरीकरण न करताच आयुक्तांकडून चालविला हा प्रकार अत्यंत निंदनिय आणि दुर्देवी आहे. त्यामुळे आयुक्तांनी प्रसिद्ध केलेली निविदा प्रक्रिया तात्काळ थांबवावी. तसेच सादरीकरण केल्यानंतर, अपेक्षित बदल केल्यानंतरच इमारतीबाबत पुढील निर्णय घ्यावा. आयुक्तांनी ही निविदा प्रक्रिया न थांबविल्यास राज्य शासनाकडे तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली जाईल. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून तीव्र आंदोलन केले जाईल. त्यात होणार्या नुकसानीस आयुक्त जबाबदार राहतील असा इशारा संजोग वाघेरे पाटील यांनी दिला आहे.






















Join Our Whatsapp Group