पिंपरी (Pclive7.com):- खेळाडूंनी पालकांना व प्रशिक्षकांना सतत प्रश्न विचारत रहावे जेणेकरून त्यांच्या अनुभवाचा आपल्याला उपयोग होईल. कठोर परिश्रम व आत्मविश्वास यांच्या जोरावर तुम्ही यशस्वी खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवू शकता असे मत भारताचा आंतरराष्ट्रीय टेनिसपटू लिएंडर पेस यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेक्टर २५, निगडी येथील चक्रवर्ती भरत टेनिस कोर्ट येथे त्यांनी नवोदित टेनिसपटूंना त्यांनी मार्गदर्शन केले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आंतरराष्ट्रीय टेनिसपटू लिएंडर पेस, रामनाथन रामकुमार, अर्जुन कढे यांचा महानगरपालिकेच्या वतीने आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा उर्फ माई ढोरे होत्या.
यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी, ‘अ’ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसदस्य मोरेश्वर शेडगे, नगरसदस्या शैलजा मोरे, सहाय्यक आयुक्त संदीप खोत, अण्णा बोदडे, क्रिडा अधिकारी रझाक पानसरे, टेनिस प्रशिक्षक नंदकिशोर रोकडे, माजी नगरसदस्य राजू दुर्गे, अमोल थोरात आदी उपस्थित होते.
टेनिसपटू लिएंडर पेस म्हणाले की, आज माझ्या आई वडिलांच्या पाठींब्यामुळे मी इथपर्यंत पोहचलो आहे. टेनिस हा जगातील एकमेव असा खेळ आहे ज्यामध्ये मुलांना व मुलींना करिअर करण्याची समान संधी उपलब्ध आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने माझे जे स्वागत केले आहे त्याने मी भारावून गेलो आहे. मी यावर्षी निवृत्त होणार असून लवकरच नव्या भूमिकेमध्ये सर्वांसमोर येणार आहे असेही ते म्हणाले.
टेनिसपटू रामनाथन रामकुमार म्हणाले, कोणताही खेळ हा आयुष्यासाठी महत्वाचा असतो. मुलांना कोणता खेळ खेळायचा आहे याचं स्वातंत्र्य पालकांनी त्यांना द्यावे. टेनिस हा सोपा खेळ नसून कठोर मेहनतीनेच यामध्ये प्राविण्य मिळविणे शक्य आहे.
टेनिसपटू अर्जुन कढे म्हणाले, कोणताही खेळ खेळाडूंनी फक्त जय-पराजय यासाठी खेळू नये. कोणताही खेळ खेळताना त्या खेळाचा आनंद खेळाडूंनी घेणे खूप महत्वाचे आहे. टेनिस हा एकमेव असा मैदानी खेळ आहे जो ७० वर्षाचा वयस्कर देखील खेळू शकतो असेही ते म्हणाले.
आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, आज लिएंडर पेस, रामनाथन रामकुमार, अर्जुन कढे यांच्यामुळे शहरातील नवोदित टेनिसपटूंना आंतरराष्ट्रीय खेळाडूंकडून मार्गदर्शनाची संधी प्राप्त झाली आहे. लहानपणापासूनच मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण करणे महत्वाचे आहे. १६ व्या वर्षानंतर दहावीमुळे मुलं खेळ सोडून उच्च शिक्षणाकडे वळतात यामुळे चांगली प्रतिभा असून देखील चांगले खेळाडू निर्माण होत नाहीत. सरकार वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन देत असते. खेळाडूंनी त्यांचा लाभ घेवून खेळांमध्ये प्राविण्य मिळवणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले.
महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी नवोदित खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी लिएंडर पेस, रामनाथन रामकुमार, अर्जुन कढे उपस्थित नवोदित टेनिसपटूंशी सराव सामने खेळून त्यांना टेनिस विषयक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. तर आभार सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी मानले.





















Join Our Whatsapp Group