पिंपरी (Pclive7.com):- मित्राकडे असलेले पिस्तूल खरे आहे की खोटं हे पाहत असताना, पिस्तूल खोटं आहे असं म्हटल्याच्या रागातून मित्रावर गोळीबार करण्यात आला. पिस्तूलातील गोळी लागून मित्र गंभीर जखमी झाला आहे. ही घटना पिंपरीतील मिलिंदनगर येथे रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास घडली आहे. गुरप्रीत हरदेवसिंग जावंद (२२, रा. पिंपरी) हा जखमी झाला असून त्याच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सन्नी परदेशी उर्फ रोकडे याच्यावर खूनी हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिलिंदनगर, डीलक्स मॉल समोर, पिंपरी याठिकाणी गुरप्रीत हरदेवसिंग जावंद व त्याचा मित्र सिद्धांत सुनील बहोज हे दोघे रिक्षामध्ये गप्पा मारत बसले होते. त्यावेळी गुन्हेगार सन्नी परदेशी उर्फ रोकडे त्यांच्या जवळ आला. त्याच्याकडे एक पिस्तूल होते. हे पिस्तूल ओरिजनल आहे की डुप्लिकेट यावरून त्यांच्यात चर्चा सुरु होती. त्यावेळी गुरप्रित याने पिस्तूल खोटं असल्याचे म्हटले. यावरून चिडून सनी परदेशी याने गुरप्रित याच्या दिशेने एक राऊंड फायर केली. ती गोळी गुरप्रीत सिंग जावंद याच्या डाव्या खांद्याला लागली. यामध्ये गुरप्रित हा जखमी झाला आहे. त्याच्यावर वायसीएम हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहेत. या प्रकाराची माहिती मिळताच रात्रपाळीचे अधिकारी उपनिरीक्षक केंगार यांनी घटनास्थळी धाव घेतली. पिंपरी पोलीस पुढील तपास करत आहेत.






















Join Our Whatsapp Group