पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरामध्ये आजपर्यंत एकुण १५ रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आलेले आहेत. यामधील ०१ रुग्णाचा १४ दिवसाचा कालावधी पुर्ण झाल्यामुळे २४ तासातील घशातील द्रव्याचे लागोपाठ दोन नमुन्याचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे त्याला आज घरी सोडण्यात आले आहे. रुग्णालयात सध्या दाखल असणा-या ०३ रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामधील आयसोलेशन कक्षामध्ये उपचार सुरु आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे घरात विलगीकरणात असणाऱ्या नागरिकांची आजपर्यंतची संख्या १७१८ असून त्या सर्वांनी किमान १४ दिवसासाठी व आवश्यकता भासल्यास पुढील २८ दिवसांपर्यत घरातच थांबण्याच्या सूचनांचे पालन करावे. तसेच सुचनांचे पालन न करणाऱ्या होम क्वारंटाईनमधील नागरिकांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असून सूचनांचे उल्लंघन करणा-या नागरिकांना पोलिसांमार्फत ताब्यात घेवून पुढील १४ दिवसांपर्यत संस्थात्मक अलगीकरण (क्वारंटाईनची) व्यवस्था केलेल्या ठिकाणी राहावे लागेल. या आदेशाचे उल्लघन करणा-यांना कायद्यानुसार सहा महिन्यांपर्यंत शिक्षेची तरतुद असून नागरिकांनी सर्व सुचनांचे पालन करावे असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे व पक्ष नेते नामदेव ढाके यांनी केले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व नविन भोसरी रुग्णालयामधून आज दि.०४/०४/२०२० पर्यंत एकुण ४२० व्यक्तींचे कोरोना (कोवीड १९) करीता घश्यातील द्रव्यांचे नमुने एनआयव्ही, पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत. पैकी आज अखेर ३६९ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. तसेच आज दि.०४/०४/२०२० रोजी एकुण २६ व्यक्तींना यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले असून त्यांचे कोरोना (कोवीड १९) करीता घश्यातील द्रव्याचे नमुने एनआयव्ही, पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.
कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड मनपामार्फत नियुक्त करण्यात आलेल्या १६० कर्मचारी यांची क्षेत्रीय सर्वेक्षण टिम घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत आहेत. आज दि.०४/०४/२०२० अखेर शहरातील कन्टेंनमेंट झोन मधील ६३४२६४ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आलेले असून पिंपरी चिंचवड मनपामध्ये आजपर्यंत १७१८ व्यक्तींना घरातील अलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले आहे. घरातील अलगीकरणात असणा-या नागरिकांनी बाहेर पडू नये. अशी व्यक्ती बाहेर पडल्याचे आढळल्यास त्याची माहिती महानगरपालिकेच्या सारथी हेल्पलाईन ८८८८००६६६६ यावर कळवावी असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे व पक्ष नेते नामदेव ढाके यांनी केले आहे.
कोरोना आजाराचे संक्रमण थांबविण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडु नये. तसेच फ्लुसारखी लक्षणे दिसून आल्यास नागरिकांनी तात्काळ वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी. पिं.चिं. मनपामार्फत हेल्प लाईन कार्यान्वित करण्यात आलेली आहे. सदर हेल्पलाईन क्रमांक ८८८८००६६६६ हा आहे. तसेच ९९२२५०१४५० हा WhatsApp क्रमांक कार्यान्वित करण्यात आलेला आहे. राज्य शासनामार्फत कार्यान्वित idsp.mkcl.org या संकेतस्थळावर संशयित कोरोना रुग्ण संबंधित माहिती देण्याचे आवाहन नागरीक तथा सर्व वैद्यकीय व्यावसायिक यांना करण्यात येत आहे.






















Join Our Whatsapp Group