पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडकरांचे टेंन्शन पुन्हा वाढले आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. शहरात ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांचा आकडा १४ वर पोहोचला आहे. तर आजपर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या २६ झाली आहे. यापैकी १२ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. तर उर्वरित १४ रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिली.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणास्तव पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात आपत्कालीन उपाययोजना लागू करण्याची व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्याची आवश्यकता निर्माण झाल्याने याकामी चांदणी चौक (पी.एम.टी. चौकाजवळ), भोसरी (पुजा टुर्स अँण्ड ट्रॅव्हल्स – भोसरी मेन रोड – मॅन्जिनिस केक शॉप – मेघना सोनोग्राफी सेंटर – लांडेवाडी रोड – पि चिंमनपा भोसरी करसंकलन कार्यालय – भगवान गव्हाने चौक – लोंढे गिरणी – विनय सुपर मार्केट – आई तुळजा भवानी मंदीर – मारुती मंदीर – पुजा टुर्स अँण्ड ट्रॅव्हल्स) क्रांतीवीर नगर , थेरगांव गावठाण मधील खालील भाग (रहाटणी लिंक रोड वरील स्वस्तिक डायमंड आपार्टमेंट – रहाटणी लिंक रोड – आस्था मेडिकल स्टोअर – तेथुन आत हॉटेल सिल्वर ९कडे जाणारा रोड – हॉटेल सिल्वर ९ – ए विंग एस ऑरा सोसायटी – रहाटणी लिंक रोड वरील स्वस्तिक डायमंड आपार्टमेंट) तसेच डांगे चौक ते आदीत्य बिर्ला रुग्णालय चौक ते तापकीर चौक ते काळेवाडी फाटा चौक ते डांगे चौक या चौका दरम्यान असलेल्या रस्त्यांवरील आवागमन फक्त अत्यावश्यक सेवांकरिता चालु ठेवणे. दिघी गावठाण स्कायलाईन सोसायटीच्या चतु:सीमा (हॉटेल द्वारकाधीश – ओम सुपर मार्केट – फेज ३ रोड – ओम साई नर्सरी – श्री. साई हॉस्पिटल – हॉटेल द्वारकाधीश) हा भाग आज शुक्रवार, दि.१० एप्रिल, २०२० रोजी रात्री ११.०० वाजलेपासून पुढील आदेशापर्यंत सील करणेचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. तसेच सदर परिसरातील संबंधित पोलिस स्टेशन प्रमुख यांचे मार्फत सदर भागाच्या हद्दी सील करणे आवश्यक आहे. तसेच सदर परिसरांच्या हद्दींमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी करणे, सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.
तसेच पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे घरात विलगीकरणात असणाऱ्या नागरिकांची आजपर्यंतची संख्या १९२२ असून त्या सर्वांनी किमान १४ दिवसासाठी व आवश्यकता भासल्यास पुढील २८ दिवसांपर्यत घरातच थांबण्याच्या सूचनांचे पालन करावे. तसेच सुचनांचे पालन न करणाऱ्या होम क्वारंटाईनमधील नागरिकांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असून सूचनांचे उल्लंघन करणा-या नागरिकांना पोलिसांमार्फत ताब्यात घेवून पुढील १४ दिवसांपर्यत संस्थात्मक अलगीकरण (क्वारंटाईनची) व्यवस्था केलेल्या ठिकाणी राहावे लागेल. या आदेशाचे उल्लघन करणा-यांना कायद्यानुसार सहा महिन्यांपर्यंत शिक्षेची तरतुद असून नागरिकांनी सर्व सुचनांचे पालन करावे असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे व पक्ष नेते नामदेव ढाके यांनी केले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व नविन भोसरी रुग्णालयामधून आज दि.१०/०४/२०२० पर्यंत एकुण ७०१ व्यक्तींचे कोरोना (कोवीड १९) करीता घश्यातील द्रव्यांचे नमुने एनआयव्ही, पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत. पैकी आज अखेर ६२३ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. तसेच आज दि.१०/०४/२०२० रोजी एकुण ७४ व्यक्तींना यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले असून त्यांचे कोरोना (कोवीड १९) करीता घश्यातील द्रव्याचे नमुने एनआयव्ही, पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत. कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड मनपामार्फत नियुक्त करण्यात आलेल्या १६० कर्मचारी यांची क्षेत्रीय सर्वेक्षण टिम घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत आहेत. आज दि.१०/०४/२०२० अखेर शहरातील कन्टेंनमेंट झोन मधील ३१९८६ नागरिकांचे दैनंदिन सर्वेक्षण करण्यात आलेले असून पिंपरी चिंचवड मनपामध्ये आजपर्यंत १९२२ व्यक्तींना घरातील अलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले आहे. घरातील अलगीकरणात असणा-या नागरिकांनी बाहेर पडू नये. अशी व्यक्ती बाहेर पडल्याचे आढळल्यास त्याची माहिती महानगरपालिकेच्या सारथी हेल्पलाईन ८८८८००६६६६ यावर कळवावी असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे व पक्ष नेते नामदेव ढाके यांनी केले आहे. कोरोना आजाराचे संक्रमण थांबविण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडु नये. तसेच फ्लुसारखी लक्षणे दिसून आल्यास नागरिकांनी तात्काळ वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी यासाठी महापालिकेच्या दवाखाने व रुग्णालये याठिकाणी स्वतंत्र बाहय रुग्ण विभाग कार्यान्वीत करण्यात आलेला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील खाजगी वैद्यकिय व्यवसायिक यांना त्यांचे रुग्णालया बाहेरील स्वतंत्र मोकळया हवेशीर ठिकाणी सर्दी, ताप, खोकला असणा-या रुग्णांसाठी वेगळा बाहयरुग्ण विभाग उभारण्यात यावा असा आदेश देण्यात आलेला आहे. पिं.चिं. मनपामार्फत हेल्प लाईन कार्यान्वित करण्यात आलेली आहे. सदर हेल्पलाईन क्रमांक ८८८८००६६६६ हा आहे. तसेच ९९२२५०१४५० हा WhatsApp क्रमांक कार्यान्वित करण्यात आलेला आहे. राज्य शासनामार्फत कार्यान्वित idsp.mkcl.org या संकेतस्थळावर संशयित कोरोना रुग्ण संबंधित माहिती देण्याचे आवाहन नागरीक तथा सर्व वैद्यकीय व्यावसायिक यांना करण्यात येत आहे.






















Join Our Whatsapp Group