पिंपरी (Pclive7.com):- लॉकडाऊनमुळे उपासमार सुरू असलेल्या पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातील बांधकाम कामगारांना दोन वेळचे जेवण देण्याच्या मागणीसाठी बांधकाम कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष जयंत शिंदे यांनी गेल्या चार दिवसांपासून घरातच उपोषण सुरू केले होते. राज्य सरकारने शिंदे यांची मागणी मान्य करणारा आदेश शुक्रवारी (दि. १०) काढला. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, भाजपचे शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात, कैलास कुटे यांनी जयंत शिंदे यांच्या आकुर्डीतील घरी जाऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. उपमहापौर हिंगे यांच्या हस्ते पाणी पिऊन शिंदे यांनी आपले उपोषण मागे घेतले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या पिंपरी-चिंचवड व पुण्यातील बांधकाम कामगारांना आपले पोट कसे भरायचे हा प्रश्न पडला आहे. त्यातच केंद्र सरकारकडून बांधकाम कामगारांसाठी राबविण्यात येणारी अटल आहार योजनाही कामगार आयुक्त कार्यालयाने बंद करून टाकली. या योजनेअंतर्गत कामगार नाक्यांवर अवघ्या ५ रुपयांत दुपारचे जेवण देण्यात येत होते. मात्र तीही बंद झाल्याने लॉकडाऊनमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील बांधकाम प्रकल्पांवर काम करणाऱ्या हजारो बांधकाम कामगारांवर उपासमारीची वेळ आली.
बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने काम करणाऱ्या बांधकाम कामगार सेनेने या कामगारांना दोनवेळचे जेवण मिळावे यासाठी कामगार आयुक्त कार्यालयाकडे सातत्याने मागणी केली. बांधकाम कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष जयंत शिंदे यांनी कामगार आयुक्त कार्यालयाचे उंबरे झिजवून बांधकाम कामगारांच्या पोटापाण्याची सोय करावी, अशी वारंवार विनंती केली. मात्र ही बाब अधिकारी गांभीर्याने घेताना दिसत नव्हते. त्यामुळे जयंत शिंदे यांनी ६ एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ई-मेलद्वारे पत्र पाठवून बांधकाम कामगारांना दोन वेळचे जेवण देण्याच्या मागणीसाठी आपण ७ एप्रिलपासून राहत्या घरातच उपोषण सुरू करत असल्याचे कळविले. तसेच बांधकाम कामगारांसाठी तातडीने जेवणाची योजना सुरू न केल्यास या उपोषण आंदोलनाची व्याप्ती वाढविण्याचा इशाराही पत्रात दिला होता.
त्यानुसार जयंत शिंदे यांनी ७ एप्रिलपासून आकुर्डीतील आपल्या राहत्या घरात उपोषण सुरू केले होते. चार दिवसानंतर राज्य सरकारने त्यांच्या या आंदोलनाची दखल घेतली. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने पुणे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि नागपूर या चार जिल्ह्यांतील नोंदीत व अनोंदीत अशा दोन्ही प्रकारच्या बांधकाम कामगारांना दोन वेळचे जेवण देण्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश कामगार आयुक्तांना दिल. जयंत शिंदे यांच्या आंदोलनामुळे बांधकाम कामगारांना न्याय मिळाला. त्यामुळे उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, भाजपचे शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात, कैलास कुटे यांनी जयंत शिंदे यांची त्यांच्या घरी भेट घेतली. तसेच उपोषण मागे घेण्याची विनंती केली. शिंदे यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत उपमहापौर तुषार हिंगे यांच्या हस्ते पाणी पिऊन आपले उपोषण मागे घेतले.






















Join Our Whatsapp Group