पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात पुणे शहर पोलिसांच्या तुलनेत मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मोठ्या अडचणी येऊ लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गैरहजर असलेल्या सर्व पोलिसांना तत्काळ हजर होण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. तरीही काहीजण जाणीवपूर्वक हजर होत नसल्याने त्यांना थेट निलंबित करण्यात आले. याबाबत पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी आदेश दिले आहेत. डी. बी. कोकणे (निगडी), विठ्ठल भगत (पिंपरी), एस. एच. रासकर (भोसरी), रतन कांबळे (एमआयडीसी भोसरी), जगन्नाथ शिंदे (निगडी), एस. एस. जाधव (देहूरोड), नलिनी पिंपळकर (तळेगाव एमआयडीसी) असे निलंबित कारण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारित ३५ ते ४० लाख इतकी लोकसंख्या आणि सुमारे ५०० चौरस किलोमीटरचा भाग येतो. मात्र, सुरक्षेची जबाबदारी पेलण्यासाठी केवळ तीन हजार पोलिस सध्या तैनात आहेत. रात्र आणि दिवस पाळी, साप्ताहिक सुट्या, किरकोळ रजा, आजारपण, कार्यलयीन कामकाज करणारे, विविध पथकांमधील पोलिस वगळता प्रत्यक्ष फिल्डवर काम करण्यासाठी काहीच पोलिस उरतात.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहराच्या सीमा देखील बंद करण्यात आल्या आहेत. प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन न करणाऱ्या ५ हजार जणांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे. अशावेळी अपुऱ्या मनुष्यबळावर नियोजन करताना वरिष्ठांची दमछाक होऊ लागली आहे. त्यामुळे गैरहजर असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना हजर राहण्याच्या सूचना यापूर्वी करण्यात आल्या होत्या. मात्र, तरी देखील काहीजण हजर होण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याचे लक्षात आल्याने पोलिस आयुक्त बिष्णोई यांनी थेट निलंबनाचे आदेश दिले आहेत. आयुक्तांनी घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.






















Join Our Whatsapp Group