पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून योग्य त्याप्रकारे खबरदारीची कडक पावले उचली जात आहेत. मात्र कोरोनाच्या या संकटाचे गांभिर्यच पिंपरी चिंचवडकरांना नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. सांगवी परिसरात आज सकाळी १० ते २ या वेळेत नागरिकांनी रस्त्यावर मोठ्या संख्येने गर्दी केल्याचे पहायला मिळाले. आता हे चित्र नुसते सांगवी पुरते मर्यादित नव्हते तर पिंपळे सौदागर, पिंपरीगाव, काळेवाडी, चिंचवड, आकुर्डीतही नागरिकांनी अशाच प्रकारे रस्त्यावर गर्दी करत ‘सोशल डिस्टंसिंग’चे तीन-तेरा वाजवले आहेत.

पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाच्या रूग्णात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दि.२७ एप्रिलपर्यंत शहरच्या सीमा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतलायं. जीवनावश्यक वस्तूंची (दूध, भाजीपाला इत्यादी) खरेदी करता सकाळी १० ते २ वाजेपर्यंतच परवानगी दिलीयं. तर चिकन आणि मटणाची दुकाने रविवार, बुधवार आणि शुक्रवारी चालू ठेवण्याचे आदेश दिलेत. नागरिकांच्या हितासाठी प्रशासनाने हे निर्णय घेतलेत. मात्र नागरिकांना त्याचं काहीच देणंघेणं नसल्याचे दिसून येत आहे. सकाळी सांगवी परिसरात नागरिक मोठ्या संख्येने जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी घराबाहेर पडले होते. चिकनच्या दुकानाबाहेर गर्दी होती. तर घोळक्यात भाजी खरेदी सुरू होती. सार्वजनिक ठिकाणी गर्दी केल्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा मोठा धोका असतो. प्रशासनाचे सक्त आदेश असताना देखील नागरिकांकडून त्याचे उल्लंघन केले जात आहे. आता अशा प्रकारे प्रशासन आणि पोलीसांना सहकार्य न करणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुज्ञ नागरिक करत आहेत. तर नागरिकांनी परिस्थितीचे भान राखत घरातच थांबणे गरजेचे आहे.






















Join Our Whatsapp Group