पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाने शंभरी ओलांडली आहे. गेल्या आठवडाभरापासून होत असलेल्या सततच्या रूग्ण वाढीमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आज (दि.२८) महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या अहवालानुसार पुन्हा ९ रुग्णांची वाढ झाली आहे. यात ‘पॉझिटिव्ह’ आढळलेले ८ रुग्ण हे निगडी, रुपीनगर परिसरातील आहेत. तर एक महिला खडकी येथील रहिवासी असून तिला महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या बाधित रुग्णांचा आकडा १०५ वर पोहोचला आहे.
कोरोनामुळे दिवसेंदिवस पिंपरी चिंचवडकरांचा चिंतेत वाढ होत आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या आज सकाळच्या अहवालात ९ रुग्ण ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत. यात ८ रुग्णांचा समावेश हा निगडी, रुपीनगर परिसरातील आहे. तर एक महिला खडकी येथील रहिवासी आहे. आज ‘पॉझिटिव्ह’ आढळलेल्या रुग्णांमध्ये सहा पुरुष असून 16, 18, 22, 24, 27, 34 वर्षाचे रुग्ण आहेत. तर तीन महिला 18, 15, 19 वर्षाच्या आहेत. या सर्वांना महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर संशयितांच्या तपासण्या सुरू करण्यात आल्या असून अजून कोणाला संसर्ग झाला आहे. याची माहिती आणि तपासणी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने सुरू केली आहे. आज ‘पॉझिटिव्ह’ आढळलेल्या या ९ रुग्णांमुळे शहरातील कोरोनाच्या आकड्याने शंभरी पार केली असून आजपर्यंत १०५ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यातील ४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर आजपर्यंत २९ जण ‘कोरोनामुक्त’ झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी खबरदारीचा उपाय म्हणून शहातील कोरोनाचे हॉटस् स्पॉट ठरत असलेले १६ परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.






















Join Our Whatsapp Group