पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील रूपीनगरमध्ये कोरोनाचे दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे कोरोनाचे संकट गंभीर होताना दिसत आहे. ते आटोक्यात आणण्यासाठी राजस्थानमधील भिलवाडा किंवा महाराष्ट्रातील बारामती पॅटर्न राबविण्यात यावे, अशी मागणी पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी शिक्षण मंडळ सभापती धनंजय भालेकर यांनी केली आहे.
याबाबत भालेकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने शंभरीचा आकडा ओलांडला आहे. आज (मंगळवारी) निगडी-रुपीनगर येथील नऊ जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. यामुळे रुपीनगर हॉटस्पॉट झाला असून आजपर्यंत परिसरात २६ रुग्ण आढळले आहेत. देशभरात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. सार्वजनिक कर्फ्यू लॉकडाऊन, कम्प्लिट लॉकडाउन, कर्फ्यू लागू झाल्यानंतरही कोरोना रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. प्रशासनाकडून वारंवार सांगूनही रूपीनगर मधील काही अतिउत्साही नागरिक रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अनुषंगाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी रूपीनगरमध्ये भिलवाडा, बारामती पॅटर्न राबविण्यात येणे गरजेचे आहे असे धनंजय भालेकर यांनी म्हटले आहे.
• भिलवाडा पॅटर्न म्हणजे काय?
राजस्थानातील भिलवाडा येथे डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वेगाने वाढली. परंतु, नंतर ही संख्या २७ पेक्षा जास्त रुग्णांपर्यंत पोहोचली नाही. लागण झालेले रुग्ण येताच भिलवाडा येथे कर्फ्यू लावून या शहराच्या सीमा सील करण्यात आल्या. जिल्ह्यातील सर्व खासगी रुग्णालये व हॉटेल ताब्यात घेण्यात आली. लॉकडाउन काटेकोरपणे पार पाडले गेले आणि घरोघरी स्क्रिनिंग केली गेली. अशा पध्दतीने उपाययोजना करून कोरोनाला वेळीच रोखण्यात आले. यामुळे भिलवाडा पॅटर्नची देशभरात चर्चा झाली. त्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रातील बारामतीतही भिलवाडा पॅटर्न राबविण्यात आला.






















Join Our Whatsapp Group