पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची पुन्हा राजकीय ताकद वाढविण्यासाठी शहरातील नेतृत्वाला विधान परिषदेवर संधी द्यावी असा सुर कार्यकर्ते काढत आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांना विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. यासंदर्भात स्थानिक नेतेमंडळींकडून पक्षश्रेष्ठींना साकडे घालण्यात येत असल्याची माहिती सुत्रांनी आहे.
राज्यात विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी येत्या २१ मे रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीची प्रक्रिया सोमवारी सुरू झाली. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत ११ मे अशी आहे. निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यासाठी सहा दिवसांचा अवधी शिल्लक असल्याने सर्वच राजकीय पक्षांमध्ये उमेदवार निश्चितीची प्रक्रिया सुरू झाली. दरम्यान यावेळी राष्ट्रवादीकडून पिंपरी चिंचवडला संधी मिळावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. विद्यमान शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांचे नाव यात आघाडीवर आहे. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे यासंदर्भात मागणी करण्यात आली आहे. शहरातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता राष्ट्रवादीकडून प्रामाणिक कार्यकर्त्याला बळ मिळण्याची गरज आहे. आमदार महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप यांच्यामुळे भाजपाचे शहर पातळीवर पारडे प्रचंड जड झाले आहे. महापालिका निवडणुकीत या दोन नेत्यांना टक्कर द्यायची असेल तर राष्ट्रवादीकडून स्थानिक नेतृत्वाला ताकद मिळणे आवश्यक आहे.
राष्ट्रवादीचे विद्यमान शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी मागील महापालिका, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत सर्वजण पक्ष सोडून जात असताना न डगमगता नेतृत्वाची जबाबदारी संभाळली आहे. संकट काळात पक्षाचा रथ एकाकी ओढला आहे. राज्यात सत्ता काळात भाजपाने शहरात दोन आमदार, एक खासदार व तीन महामंडळे देऊन कार्यकर्त्यांना बळ दिले होते. आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाढीसाठी संजोग वाघेरे पाटील यांना विधान परिषदेवर संधी देतील अशी अपेक्षा कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.






















Join Our Whatsapp Group