पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या धर्तीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या गरजू कष्टकऱ्यांच्या मदतीसाठी अन्नामृत फाउंडेशन आणि नाना काटे मित्र परिवार यांच्या वतीने गेल्या महिनाभरापासून दररोज चारशे ते पाचशे लोकांना जेवणाचे वाटप करण्यात येत आहे. यासाठी महापालिकेचे विरोधी पक्षनेते नाना काटे यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे.
काळेवाडी गावामधील हातावर पोट असणाऱ्या व लॉकडाऊन काळात संकटात सापडलेल्या हजारो नागरीकांना सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ ननावरे यांच्या पुढाकारातून हे जेवणाचे वाटप करण्यात येत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सौरभ चौधरी, सुधीर सोनवणे, अमोल भोसले, सन्नी नढे, मयूर गायकवाड आदी कार्यकर्ते या मदतकार्यात सहभागी झाले आहेत.
यासंदर्भात बोलताना राजाभाऊ ननावरे म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. भारतामध्ये आणि विशेषतः पुणे शहरात देखील याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. कोरोना विषाणूच्या संक्रमणापासून बचाव व्हावा यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील हजारो कष्टकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले असून त्यांच्या मदतीसाठी एक सामाजिक कर्तव्य या भावनेतून आमच्या अन्नामृत फाउंडेशन आणि नाना काटे मित्र परिवाराच्या माध्यमातून आम्ही गेल्या महिनाभरापासून हा अन्नवाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे.
याचाच एक भाग म्हणून लॉकडाऊनच्या काळात काळेवाडी भागात राहणाऱ्या गरजू नागरिकांना आम्ही अन्न वाटप करीत असून जोपर्यंत जनजीवन सुरळीत होत नाही तोपर्यंत दररोज आम्ही हे कार्य सुरू ठेवणार असल्याचेही ननावरे यांनी यावेळी सांगितले.






















Join Our Whatsapp Group