पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. महापालिका प्रशासनाकडून त्याअनुषंगाने योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र दापोडी परिसरात सध्या जुगार, मटक्यासारख्या अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. त्यामुळे सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडत असून कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका वाढत आहे. म्हणूनच दापोडी परिसरातील अवैध धंदे पोलीसांनी त्वरित बंद करावेत अशी मागणी स्थानिक नगरसेवक रोहित काटे यांनी केली आहे.
यासंदर्भात बोलताना नगरसेवक रोहित काटे म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरात सध्या कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषत: झोपडपट्टी भागात हा आजार प्रामुख्याने पसरताना दिसत आहे. दापोडी प्रभागात झोपडपट्ट्यांचे प्रमाण जास्त आहे. आजपर्यंत नऊ ते दहा रुग्ण या परिसरात पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर तीन रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. महापालिका तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांकडून प्रभागात कोरोना विरोधात जनजागृती करण्यात येत आहे. सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र या परिसरात जुगार, मटका सारखे अवैद्य धंदे राजरोसपणे सुरू आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव या परिसरात वाढण्याची मोठी भीती निर्माण झाली आहे. याबाबत भोसरी पोलिसांकडे तक्रार देखील केली आहे. मात्र तरीदेखील हे अवैध धंदे सुरू आहेत. दापोडीतील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर हे अवैध धंदे तात्काळ बंद होणे गरजेचे आहे, तशी मागणी लवकरच आम्ही पोलीस आयुक्तांकडे करणार आहोत.























Join Our Whatsapp Group