नवी दिल्ली (Pclive7.com):- गेल्या २४ तासांमधील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता भारताने युनायटेड किंगडमला मागे टाकत सर्वाधिक कोरोनाबाधितांच्या यादीत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार भारतात कोरोना रुग्णांची संख्या तीन लाखांच्या घरात पोहचली आहे. सध्या भारतातील कोरोनाबाधितांची संख्या दोन लाख ९८ हजार २०५ इतकी झाली आहे. गेल्या आठवड्यात स्पेनला मागे टाकत भारत पाचव्या स्थानावर पोहचला होता. ही गोष्ट भारतासाठी अत्यंत चिंताजनक असल्याची बाब समोर येत आहे. तर अमेरिका, ब्राझील, रशियामध्ये देखील कोरोना रुग्णांची संख्येत सतत झपाट्याने वाढ होत आहे.
जगातील सर्वात शक्तीशाली अमेरिकेला कोरोना व्हायरसचा सर्वाधिक जास्त फटका बसला आहे. अमेरिकेत आतापर्यंत २० लाख ८९ हजार ७०१ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सर्वाधिक कोरोनाबाधित असलेल्या देशात अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिकेतील मृत्यूची संख्याही सर्वाधिक असून आतापर्यंत एक लाख १६ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ब्राझिलमध्ये ८ लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर तिसऱ्या स्थानावर असलेल्या रशियामध्ये पाच लाखांपेक्षा जास्त रुग्ण आहेत.
भारताच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी सकाळी ९,९९६ नव्या रुग्णांची भर पडली. सलग नवव्या दिवशी नऊ हजारहून अधिक रग्ण वाढले. एकूण ८,१०२ मृत्यू झाले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये एका दिवसातील सर्वात जास्त म्हणजे ३५७ मृत्यू नोंदवले गेले. भारतामध्ये एक लाख लोकसंख्येमागे ०.५९ मृत्यू झाले असून जगभरातील हे सर्वात कमी प्रमाण आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ४९.२१ टक्के झाले असून ते बुधवारी ४८.३७ टक्के होते. उपचाराधीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या गुरुवारीही जास्त होती. उपचाराधीन रुग्ण १.३७ लाख व बरे झालेले रुग्ण १.४१ लाख इतके आहेत.























Join Our Whatsapp Group