पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना बाधित रुग्ण वाढत आहे. शहरात कोरोना रुग्णाचा ७ हजारांच्या पार झाला असून बाधित रुग्णांना सरकारी व खाजगी रुग्णालयात बेड्स उपलब्ध नाहीत. त्यामुळे शहरातील सर्व खाजगी रुग्णालये पिंपरी चिंचवड महापालिकेने ताब्यात घ्यावीत अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष सुरेश निकाळजे यांनी केली आहे.
यासंदर्भात सुरेश निकाळजे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. त्यात म्हटलयं की, पिंपरी चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोना हातपाय पसरत आहे. शहरात आज घडीला ७ हजार रुग्णांचा आकडा पार झाला आहे. धक्कादायक म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कोरोना संसर्गाशी लढण्यासाठी पिंपरीतील वायसीएम, भोसरी, मोशीतील महानगरपालिका रुग्णालय, बालेवाडीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगण इत्यादी कोविड केअर सेंटर म्हणून जाहीर केले. त्या ठिकाणी फक्त कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील खाजगी रुग्णालय जसे की आदित्य बिर्ला, लोकमान्य आदी रुग्णालयाने देखील काही बेड्स कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवले होते. परंतु ह्या खाजगी रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांची पैश्याची लूट केली जात आहे. रुग्णांना व्यवस्थित उपचार केले जात नाहीत. प्रत्येकी रुग्णांचे बिल लाख रुपये घेतले गेले. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे काही रुग्णही दगावले आहेत. सध्या पिंपरी चिंचवड शहरातील खाजगी रुग्णालयाने कोरोना संसर्गासाठी नो बेड्स असे बोर्ड लावले आहेत. आणि शहरातील परिस्थिती आणखी बिघडत चालली आहे.
शहरात कोरोना तपासणी पालिका प्रशासनाने वाढवल्यामुळे कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात मिळून येत आहेत. दररोज ५०० ते ६०० रूग्ण महापालिका क्षेत्रात सापडत आहेत. पुणे महानगरपालिका हद्दीतील कोरोना रूग्ण ही पिंपरी चिंचवड शहरात उपचार घेत आहे. व पुढील स्थिती खूपच भयंकर होणार आहे. रोज रुग्णाची वाढती संख्या पाहता पुढील १० दिवसात रूग्ण संख्या १० ते १५ हजार होण्याची भीती आहे. तरी महाराष्ट्र शासन व महानगरपालिका प्रशासनाने खाजगी रुग्णालयातील २५ टक्के वॉर्ड्स इतर आजारासाठी राखीव ठेऊन संपूर्ण ७५ टक्के रुग्णालय ताब्यात घ्यावे जेणेकरून कोरोना रुग्णांचा उपचार खाजगी रुग्णालयात देखील मोफत होईल. व कोरोनमुक्त रुग्णांची संख्या ही वाढेल आणि लवकरच पिंपरी चिंचवड शहर कोरोनामुक्त होईल असे सुरेश निकाळजे यांनी म्हटले आहे.























Join Our Whatsapp Group