पिंपरी (Pclive7.com):- लॉकडाऊन असूनही पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा कहर सुरू आहे. मागील पाच दिवसात दररोज ४०० ते ५०० हून अधिक पॉझिटिव्ह रूग्ण सापडत आहेत. या महामारीचा विळखा आता शहरात घट्ट होत असून बाधित रूग्णांच्या संख्येने १० हजारांचा टप्पा पार केला आहे. शहरात आज (दि.१८) दुपारी ३ वाजेपर्यंत १०१०२ बाधित रूग्णांची नोंद झाली असून दिवसेंदिवस धोका वाढत चालला आहे.
महापालिकेच्या कोरोना वॉररूममधून मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड शहरात सध्या ३५८३ अँक्टिव्ह रूग्ण असून विविध रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आजपर्यंतच्या बाधित रूग्णांची संख्या १०१०२ एवढी झाली आहे. दरम्यान शहरातील १७१ रूग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून शहराबाहेरील ४७ जण दगावले आहेत. त्यामुळे एकूण बळींची संख्या २१८ वर पोहचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे बरे होणार्या रूग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. आजपर्यंत ६३५० रूग्ण ‘कोरोनामुक्त’ झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
कोरोनाचा संसर्ग शहरातील आमदार, नगरसेवक, महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी यांना देखील झाला आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचा मृत्यू देखील कोरोनाचा उपचार सुरू असताना झालेला आहे. या आजाराची वाढती परिस्थिती पाहता सर्वच स्तरातून शहरात पुन्हा कडक लॉकडाऊन करण्यात यावा अशी मागणी केली जात होती. त्याअनुषंगाने जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सोमवार दि.१३ जुलैपासून ५ दिवसांच्या कडक लॉकडाऊनचे आदेश दिले होते. मात्र गेल्या पाच दिवसात दोन हजारांहून अधिक बाधित रूग्णांची नोंद झाली आहे. शहरातील रूग्णालयात बेडची देखील मोठी कमतरता भासत आहे. त्यामुळे कोरोनाला नेमकं आयोक्यात आणायचं कसं हे आवाहन पालिका प्रशासनापुढे आहे.























Join Our Whatsapp Group