पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या या संकटकाळात राज्यातील नागरिक आर्थिक अडचणीत सापडला आहे. मुलांच्या शालेय फी साठी शाळांकडून तकादा लावला जात आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच विद्यार्थींची फी माफ केल्यास जनतेला आर्थिक दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांनी विद्यार्थ्यांची सरसकट शालेय फी माफ करावी अशी मागणी नगरसेवक उत्तम केंदळे यांनी केली आहे.
यासंदर्भात उत्तम केंदळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना विषाणूमुळे देशात व राज्यात लाॅकडाऊन जाहीर केले आहे. लॉकडाऊननंतर अटी शिथिल केल्या गेल्या मागील काही दिवसापासून नागरिकांचे दैनंदिन जीवन थोड्या फार प्रमाणात सुरू झाले आहे. परंतू नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच मुलांच्या शालेय शुल्क भरणे जास्तच कठीण जाणार आहे. त्यामुळे सरसकट फी माफीचा विचार राज्य सरकारने करावा.
सद्यपरिस्थितीत राज्यात खाजगी व विनाअनुदानित शाळांकडून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक फी भरण्याची सक्ती केली जात आहे. त्यामुळे राज्यातील नागरिक त्रस्त आहेत. राज्य सरकारने मे महिन्यात राज्यातील शाळांना शुल्क वाढ आणि जमा करण्याची सक्ती करू नये असा निर्णय व परिपत्रक सर्व संस्थाना दिले आहे. राज्यातील काही संस्था, शाळा यांच्या अनेक तक्रारी येत असताना शासनाचा निर्णय डावलत आहेत. शासन निर्णयाचे पालन न करता, पालकांना खाजगी व विनाअनुदानित शाळांकडून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक फी भरण्यासाठी अतिरेक चालू आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या शाळांवर तात्काळ कठोर व कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. याबाबत योग्य निर्णय घ्यावा वशालेय शुल्कात सरसकट माफी मिळाली पाहिजे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना व विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल अशी मागणी उत्तम केंदळे यांनी केली आहे.























Join Our Whatsapp Group