पिंपरी (Pclive7.com):- मोहननगर येथील ईएसआय रूग्णालयात कोरोना बाधित रूग्णांना निकृष्ट दर्जाचे भोजन पुरवठा करणाऱ्या ठेकेदारावर त्वरित फौजदारी कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मोहननगर येथील ईएसआय रुग्णालयात 100 कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. येथील डॉक्टर अतिशय चांगल्या पद्धतीने या रुग्णांवर उपचार करत असून त्याबाबत रुग्ण व त्यांचे नातेवाईक समाधानी आहेत. या रुग्णांना महापालिकेच्या ठेकेदाराच्या वतीने भोजन पुरवली जाते. या जेवणामध्ये माशा, आळ्या सापडण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. त्याची त्यावेळी आम्ही रीतसर तक्रार केली होती. मात्र संबंधित ठेकेदाराने त्यामध्ये कुठलीही सुधारणा केलेली दिसत नाही. उलट काल 23 जुलै 2020 रोजी पुन्हा माशा, आळ्या व निकृष्ट चपात्या, भाज्या रुग्णांना देण्यात आल्या होत्या. याबाबत काल रुग्णांनी तक्रार आक्षेप घेतला आहे.
खरे तर कोरोनाच्या रुग्णांना सकस दर्जेदार व ताजे भोजन देऊन रुग्ण लवकर बरे व्हावेत यासाठी महापालिका आणि राज्य शासनाचा प्रयत्न आहे. मात्र संबंधित ठेकेदार महापालिकेकडून लाखो रुपयांचे बिल वसूल करून रुग्णांना निकृष्ट दर्जाचे भोजन देऊन रुग्णांच्या जीविताशी खेळत आहे. ही महानगरपालिकेची आणि करदात्या नागरिकांची व रुग्णांची फसवणूक आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून गुन्हा नोंदवावा. म्हणजे इतर सर्व रूग्णालयात देखील भोजन पुरवठा करणारे ठेकेदार सुधारतील व रुग्णांना त्याचा लाभ मिळेल. तरी आयुक्तांनी त्या ठेकेदाराच्या विरोधात त्वरित फौजदारी दाखल करावा अशी मागणी मारूती भापकर यांनी केली आहे.























Join Our Whatsapp Group