पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या सावटामुळे यंदा पिंपरी चिंचवडकरांनी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा. मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन महापौर माई ढोरे आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील पदाधिकारी आणि अधिकारी यांनी भूमिका जाहीर केली आहे. महापौर माई ढोरे आणि सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कोविड योध्दे व स्वंयसेवक म्हणून पुढे यावे असे आवाहन केले आहे.
गणेशोत्सवामध्ये श्री गणेश मूर्तीच्या उंचीपेक्षा मनातील भाव मोठा असला पाहिजे. म्हणून यावर्षी गणेश मूर्ती ही पर्यावरणपूरक शाडूची असावी. मूर्तीचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास गणेशमूर्ती स्वंयसेवी संस्थाना मूर्तीदान कराव्यात. जेणेकरून आगमन, विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळून स्वत: व कुटुंबियांचे कोरोना साथीपासून रक्षण होईल, असे आवाहन महापौरांनी केले आहे. मंडळांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरती, भजन, कीर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. शासनाने व महापालिकेने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. मूर्तीदानाच्या उपक्रमास स्वंयसेवी संस्थानी क्षेत्रिय अधिकाऱ्यांकडे संपर्क साधावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले.
गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याबाबत शहरवासियांना आवाहन करण्याचा व्हिडिओ आयुक्तांनी प्रसिध्द केला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिका युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. पोलिस प्रशासन कंटेन्मेंटची अंमलबजावणी करत आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी यापूर्वी साजरे केलेल्या सणांप्रमाणेच गणेशोत्सव साजरा करायचा आहे. मात्र, यावर्षी काही बंधने पाळायची आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ द्यायचा नसेल. तर, आपल्याला कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढत येणार नाही. घरातल्याच मूर्तीची शक्यतो प्रतिष्ठापना करावी. घरातल्या घरातच त्याचे पूजन करावे आणि घरातल्या घरातच विसर्जनही करावे. महापालिकेच्या वतीने गणेश विसर्जनासाठी विविध ठिकाणांवर घाटांची सुविधा उपलब्ध केली जाणार नाही.
आपल्याला भक्ती-भाव, उत्साह कमी न करता आपल्या घरातच राहून गणरायाची मनोमन पूजा करायची आहे. सर्वांच्या आरोग्याची, शहरवासियांच्या निरोगी जीवनाची मनोकामने प्रार्थना करायची आहे. विद्या, कला, गुण या सर्वांची आराधना करुन हा गणेशोत्सव घरातल्या घरातच साजरा करावा, असे आवाहन करत नागरिक सहकार्य करतील असा विश्वास आयुक्त हर्डीकर यांनी व्यक्त केला.






















Join Our Whatsapp Group