पिंपरी (Pclive7.com):- काळेवाडी येथील धोंडीराज मंगल कार्यालयात एका तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. बुधवारी (दि.१९) रात्री ही घटना घडली असून वडापावच्या गाडीवरून हा खून झाला असल्याची माहिती समोर येत आहे. शुभम जनार्धन नखाते (वय ३०, रा. साईबाबा मंदिर, तापकीर चौक, काळेवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
या प्रकरणी राज तापकीर व त्याचे मित्र ज्ञानेश्वर राजेंद्र पाटील (वय २३, प्रवीण धुमाळ (वय २१), अविनाश धनराज भंडारीे (वय २३), अजय भारत वाकोडे (वय २३), मोरेश्वर रमेश आष्टे (वय २१) (सर्व रा. साईबाबा मंदिर, तापकीर चौक, काळेवाडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर राज तापकीर व मोरेश्वर आष्टे यांना अद्याप अटक करण्यात आली नसून अन्य पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसापूर्वी वडापावच्या गाड्यावरून मयत शुभम नखाते आणि आरोपी यांच्यामध्ये भांडण झाले होते. त्या भांडणाच्या रागातून त्यांच्यात बुधवारी (दि. १९) दुपारी साडेचार वाजता पुन्हा भांडण झाले. बुधवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास आरोपींनी मयत शुभम याला तापकीर चौकातील धोंडीराज मंगल कार्यालय येथे भांडण मिटवण्यासाठी बोलवले. यावेळी शुभमच्या डोक्यात कोयत्याने सपासप वार केले. त्यातच शुभमचा मृत्यू झाला.
पोलिसांना माहिती मिळताच वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. मयत शुभम याच्यावर विनयभंग आणि पोक्सोचा गुन्हा दाखल आहे.






















Join Our Whatsapp Group