मुंबई (Pclive7.com):- देशात आणि महाराष्ट्रात दररोज हजारोंच्या संख्येनं रुग्ण आढळून येत आहेत. तर मृत्यू होणाऱ्या रुग्णांचा आकडाही मोठा आहे. कोरोनामुळे देशात ६४ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीतून दिसून येत आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कोरोनामुळे मृत्यू होत नाहीत, सर्व मृत्यू नैसर्गिक आहेत, असा दावा केला आहे. कोरोना आहे, यावरही आपला विश्वास नसल्याचं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे विधान केलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी धार्मिक स्थळं खुली करण्याच्या मागणीसाठी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरासमोर आंदोलन केलं होतं. त्यानंतर दिलेल्या मुलाखतीत त्यांनी कोरोना आणि परिस्थितीवर भूमिका मांडली.
धार्मिक स्थळं खुली करण्यामागे तुमची नेमकी भूमिका काय आहे? गर्दी होऊ नये असे प्रयत्न केले जात असताना अशी मागणी का केली जात आहे? असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांना विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, सरकारला कोरोनाविषयी काहीही कल्पना नाही, असं मला वाटतं. दुकानं सुरू करण्यासाठी, एसटी सुरू करण्यासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलन करावं लागत आहे. आज मंदिरं उघडा, यासाठी आंदोलन केलं. हे शासन कोरोनाच्या नावावर लोकांना फसवत आहे. कोरोना आहे, यावर माझा विश्वास नाही, असं आंबेडकर म्हणाले.
महाराष्ट्रात दररोज दोनशे ते अडीशे लोकांचा मृत्यू कोरोनामुळे होत असताना तुम्हाला असे का वाटते की सरकार कोरोनाच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत आहे?, कोरोनामुळे लोकांचा मृत्यू होतोय हे तुम्हाला का मान्य नाही? या प्रश्नावर भूमिका मांडताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, जो माणूस जन्माला आला, त्याचा मृत्यू एकादिवशी होणारच. जर दहा कोटी लोकांमध्ये दोनशे अडीचशे लोकांचा मृत्यू झाला, तर त्यात नवीन काय आहे? भारतीय स्वत:शी तर लढत असतात, पण निसर्गाशी लढण्याचा आव आणत असतो. यापेक्षा मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला, तर मी मान्य करेल. कोरोनामुळे हे मृत्यू होत नाहीत. सर्व मृत्यू नैसर्गिक आहेत, असं सांगत आंबेडकर म्हणाले, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे व्यक्तीचा मृत्यू होत असल्याचा काय पुरावा आहे? पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे का, की कोरोनामुळे मृत्यू झाला आहे? माझा यावर आजिबात विश्वास नाही. कारण मी माणसं जगताना बघतोय, असं आंबेडकर यांनी सांगितलं.























Join Our Whatsapp Group