पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात एका रात्रीत दोन सोन्याची दुकाने फोडली असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. वाकड आणि निगडी येथील दोन ज्वेलर्सची दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडल्याच्या घटना आज (दि.२०) सकाळी उघडकीस आल्या आहेत. वाकड येथील घटनेत तीन किलो चांदी आणि पाच ग्राम सोने तर निगडी येथील घटनेत चांदी चोरीला गेली आहे.
म्हातोबानगर, वाकड येथे पी.आर. ज्वेलर्स हे दुकान आहे. शनिवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानातून चोरट्यांनी तीन किलो चांदी आणि पाच ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे. वाकड पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांचा तपास सुरु आहे.
दुसरी घटना आकुर्डी विठ्ठल मंदिराजवळ असलेल्या श्री नवकार ज्वेलर्स या दुकानात घडली. आकुर्डी येथील विठ्ठल मंदिराजवळ सुरेंद्र पुनमिया यांचे ज्वेलर्स आणि कपड्यांचे दुकान आहे. दोन्ही दुकाने एकाच ठिकाणी आहेत. शनिवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानातून चांदी चोरून नेली आहे.
चोरून नेलेल्या चांदीबाबत पुनमिया यांनी सविस्तर माहिती पोलिसांना अद्याप दिलेली नाही.
निगडी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असून पोलिसांचा तपास सुरु आहे.




















Join Our Whatsapp Group