पिंपरी (Pclive7.com):- कोरोना या महामारीचा प्रादुर्भाव पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात झालेला आहे. अद्यापही कोरोना पूर्णपणे संपलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत फटाके स्टाॅल व फटाके विक्रीस बंदी करण्यात यावी अशी मागणी बाराबलुतेदार महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशसचिव विशाल जाधव यांनी केली आहे.
यासंदर्भात विशाल जाधव यांनी महापौर माई ढोरे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण जगावर महामारी कोविड-१९ (कोरोना) चे संकट आहे आहे. ह्या साथीच्या रोगाची उपाय योजना करताना कोरोना पीडितांना श्वास घेताना सर्वात जास्त त्रास होत असल्याची बाब समोर आली आहे. हा आजार फुफ्फुसांशी संबंधित आहे. जे कोरोनामधून बरे होतात त्यांना पूर्णपणे सामान्य होण्यासाठी खूप वेळ लागतो. आता सर्वत्र कोरोनातुन बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
म्हणूनच यावर्षी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीत फटाके फोडू नयेत. तसेच संपूर्ण परिसर प्रदुषण मुक्त रहावा यासाठी फटाक्यांपासून दूर रहाणे ही काळाची गरज बनली आहे. पिंपरी चिंचवड शहर प्रदुषणमुक्त रहाण्यासाठी आपणच ही पाऊले उचलणे जरुरीचे आहे. या साथीच्या रोगात हा विषारी वायू कोठेही होम क्वारंटाईनमध्ये राहणा-या रूग्णांसाठी अतिशय प्राणघातक ठरू शकतो. विषारी धुरामुळे कोणत्याही जीवाला धोका होऊ शकतो.
तज्ञ डॉक्टरांच्या अहवालानुसार कोरोना कालावधीत फटाक्यांचा धूर प्राणघातक ठरू शकतो. दिपावली मध्ये, आपले शहर धुराने भरण्यापासून तसेच फटाक्यांच्या विषारी वायू पासून वाचविण्याची गरज आहे. कोरोनाशी संघर्ष करीत असलेल्या किंवा कोरोनामुळे ग्रस्त झालेल्या रुग्णांना वाचवण्यासाठी देखील आपण हा निर्णय घ्यावा.
पिंपरी चिंचवड शहरात यंदाच्या वर्षी कोणत्याही व्यापाऱ्यांस फटाके विक्रीस परवानगी देऊ नये. तसेच फटाके विक्रीस बंदी घालण्यात यावी अशी मागणी विशाल जाधव यांनी केली आहे.






















Join Our Whatsapp Group