पिंपरी (Pclive7.com):- सांगवी परिसरातून मोबाईल फोन चोरणारा आरोपी पोलीसांच्या जाळ्यात आला आहे. त्याच्याकडून १ लाख चार हजार किंमतीचे तब्बल १५ चोरलेले मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत. एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने आरोपी हे फोन पळवत असल्याचा प्रकार पोलीस तपासात समोर आला आहे.
मार्शल सबेस्टीन उर्फ मुकुल डिसोजा (वय २१ वर्षे, रा .के. /ओं.स्वामी लक्ष्मीनगर लेन नं.५, पिंपळे गुरव, पुणे) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.
सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक रंगनाथ उंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उप निरीक्षक यशवंत साळुके व तपास पथकातील पोलीस पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार विजय मोरे, अरुण नरके व प्रविण पाटील यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की, दोन मुले ही कृष्णा चौक नवी सांगवी येथे चोरीच्या मोबाईल फोनचे लॉक तोडण्यासाठी येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कृष्णा चौकातील मोबाईलच्या दुकानात ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन लॉक तोडण्यासाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांचेकडील मोबाईल फोनबाबत चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी तो मोबाईल फोन हा लक्ष्मीनगर गल्ली नं.१ समोरील पत्र्याच्या खोलीमधुन चोरी केल्याचेे कबूल केले.
त्यानुसार आरोपी मार्शल सबेस्टीन उर्फ मुकुल डिसोजा (वय २१ वर्षे, रा. के./ओं.स्वामी लक्ष्मीनगर लेन नं.५, पिंपळे गुरव, पुणे) याला अटक करण्यात आली. पोलीस कोठडीत अधिक तपास केला असता आरोपी हा विधीसंघर्षित बालकाच्या मदतीने मोबाईल फोन चोरत असल्याचा प्रकार समोर आला. पोलीसांनी आरोपीकडून १ लाख चार हजार किंमतीचे १५ मोबाईल फोन हस्तगत केले आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ श्री आनंद भोईटे, सहा. पोलीस आयुक्त वाकड विभाग गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे, व पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले, तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक यशवंत साळुंके, पोलीस हवालदार चंद्रकांत भिसे, पोलीस नाईक कैलास केंगले, सुरेश भोजणे, रोहिदास बोहाडे, पोलीस शिपाई अरुण नरळे, विजय मोरे, प्रविण पाटील, शशीकांत देवकांत, नितीन खोपकर, अनिल देवकर, हेमंतकुमार गुत्तीकोंडा, दिपक पिसे, शिमोन चांदेकर यांनी केली आहे.






















Join Our Whatsapp Group