बहुतांश पालक फी भरत नसल्याने फेडरेशन ऑफ स्कूल असोसिएशनचा निर्णय
पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या परिस्थितीत अनेक शाळा बंद पडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शालेय शिक्षण क्षेत्रात आर्थिक असुरक्षितता निर्माण झाली आहे. पालक शाळेची फी भरेनासे झाले आहेत. त्यामुळे फी नाही तर शाळा नाही असे सांगत पुणे, पिंपरी चिंचवडसह चाकण आणि खेड मधील तब्बल १४८३ सर्व खाजगी शाळांनी मंगळवार दि.१५ ते १७ डिसेंबर (तीन दिवस) ऑनलाईन स्कूल बंद ठेवण्याचा निर्णय फेडरेशन ऑफ स्कूलस असोसिएशन महाराष्ट्र या संघटनेने घेतला आहे.
शाळांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. यापुढे शिक्षण सुरू ठेवणे आम्हाला अशक्य आहे. त्यामुळे संघटनांनी ३ दिवसांचे शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. या ३ दिवसात खाजगी शाळांचे शैक्षणिक कामकाज पूर्ण बंद राहील. या बंदच्या माध्यमातून राज्यातील खाजगी शाळांची दयनीय अवस्था सर्वांच्या नजरेत येईल म्हणून हे आंदोलन करण्यात येत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
याबाबत ‘पीसी लाईव्ह न्यूज’शी बोलताना प्रायव्हेट इंग्लिश मेडियम स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र सिंग म्हणाले की, कोविड परिस्थितीमुळे अचानक शाळा बंद झाल्या असल्या तरी अध्ययन, अध्यापन कार्यात खंड पडू नये याकरिता आमचे शिक्षक आणि शाळांनी शिक्षणाची दरी कमी करण्यासाठी स्वत: ला ऑनलाईन प्रशिक्षण सत्रामध्ये सुसज्ज केले व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या पालकांनी संपर्क साधला आहे, आम्ही त्यांना मदत केली. परंतु असे बरेच पालक आहेत ज्यांनी कोणत्याही कारणास्तव शाळांशी संपर्क साधला नाही किंवा फी दिली नाही.
या ६ ते ७ महिन्यांत आमच्या लक्षात आले आहे की काही पालक आमचे कॉल टाळत आहेत आणि फी देखील भरत नाहीत. आम्ही या ६ महिन्यांत मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले. परंतु केवळ ३० ते ४० टक्केच पालक फी भरत असल्याने व शाळेचा सर्व खर्च फीवर अवलंबून असल्याने हा सर्वशालेय कारभार सुरळीत चालण्यासाठी आवश्यक आर्थिक पाठबळ नाही. त्यामुळे आम्ही गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास सक्षम असलो तरीही असमर्थ आहोत.
याचा परिणाम शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांच्या जीवनावर होत आहे. म्हणूनच, महाराष्ट्र राज्यातील शाळांची आपली असमर्थता व दयनीय परिस्थिती दर्शविण्यासाठी आणि बेजबाबदार कारभारामुळेही पुणे, पिंपरी चिंचवड, चाकण, खेड मधील सर्व शाळांचे ऑनलाईन वर्ग ३ दिवस म्हणजेच दि.१५, १६ आणि १७ डिसेंबर २०२० पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान तीन दिवस शाळा बंद ठेवण्याच्या या निर्णयाची दखल राज्य सरकारने न घेतल्यास जानेवारी महिन्यात राज्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याची भूमिका स्कूल ऑफ फेडरेशन घेणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला.






















Join Our Whatsapp Group