पिंपरी (Pclive7.com):- जुन्या मुंबई-पुणे रोडवरील निगडी गावठाणात भुयारी मार्ग तातडीने करण्यात यावा अशी मागणी भाजप, मनसे, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सर्वपक्षीय आठ नगरसेवकांनी एकत्रितपणे केली आहे. यासंदर्भात सर्व नगरसेवकांनी आज महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले आहे.
यावेळी विरोधी पक्षनेते राजु मिसाळ, माजी उपमहापौर शैलजा मोरे, माजी स्थायी समिती अध्यक्ष नगरसेविका सुमनताई पवळे, मनसे गटनेते सचिन चिखले, क्रीडा सभापती उत्तम केंदळे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिलाताई बाबर, माजी फ प्रभाग अध्यक्षा कमलताई घोलप, माजी स्थायी समिती सदस्य अमित गावडे या आठ नगरसेवकांचे मागणीचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले.
यावेळी राजेंद्र काळभोर, शंकर उर्फ आप्पा काळभोर, रोहिदास शिवणेकर, चंद्रकांत बाळा दाणवले, उत्तम ढाणे काका, ओमकार पवळे, पुदित शेमलीनी, उज्वला माळी, नूर खान, नैनाराम आदी उपस्थित होते.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निगडी गावठाण येथील जुना मुंबई-पुणे रोड येथे महापालिकेमार्फत २००८ साली कै.मधुकर पवळे उड्डाणपूल उभारण्यात आला. दरम्यान निगडी नाका येथे भक्ती-शक्ती उड्डाणपूल उभारण्याचे काम चालू आहे. मागील दोन ते तीन दिवसांपूर्वी भक्ती-शक्ती येथील उड्डाणपुलावरील मुंबई-पुणे मार्गाचे उद्घाटन करण्यात आले आहे. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहने जोरात ये-जा करत आहेत. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी रस्ता ओलांडत असताना काही लोकांचे अपघात झालेल आहेत. यामध्येही लोक मृत्युमुखी पडलेले आहेत.
निगडी गावठाणमध्ये रस्त्याच्या बाजूला मोठी बाजारपेठ आहे. दोन ते तीन शाळा या परिसरात आहेत. अमृता नंदमय मठ, विद्यानंद भवन शाळा, महानगरपालिकेची शाळा यापरिसरात असल्यामुळे विद्यार्थ्यांची व पालकांची मोठा प्रमाणात ये-जा येथे होत असते. २०१२ पासून आम्ही सर्व नगरसेवक वेळोवेळी महापालिकेकडे या सर्व गोष्टींची माहिती देत आहोत. तसेच याठिकाणी अंडरपास व भुयारी मार्ग करून द्यावा यासाठी मागणी करत आहोत. तरी याचे गांभीर्य घेऊन लवकरात लवकर जुन्या मुंबई-पुणे रोडवरील निगडी गावठाणात भुयारी मार्ग करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
या कामासाठी दोन्ही प्रभागातील सर्व आठ नगरसेवकांनी हेवेदावे विसरून एकत्र येत मागणी केली आहे. तसेच हे काम जर केले गेले नाही तर आंदोलन केले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे.






















Join Our Whatsapp Group