पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या नगरसेविका भीमा पोपट फुगे यांचे पती पोपट फुगे यांच्या नावावर भोसरी येथे इमारत असून वरच्या मजल्यांचे अनधिकृतपणे बांधकाम झाले आहे. संबंधितांनी महापालिकेला अनधिकृत बांधकामाची कोणतीही माहिती दिली नाही. तसेच महापालिकेच्या कराचे २२ लाख ८५ हजार १६३ रूपये देखील थकीत ठेवले असल्याचा आरोप भोसरीतील सामाजिक कार्यकर्ते अनिल फुगे यांनी केला आहे. महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी नगरसेविका भीमा पोपट फुगे यांचे नगरसेवक पद रद्द करावे. अशी मागणी फुगे यांनी भोसरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली.
अनिल फुगे म्हणाले की, पिंपरी चिंचवड महापालिकेने अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी कंबर कसली आहे. शहरातील विविध ठिकाणी असणारी अनधिकृत बांधकामे महापालिकेचा अतिक्रमण विभाग जमीदोस्त करत आहे. एका बाजुला सर्वसामान्यांची घरे पाडली जात आहेत. तर दुसरीकडे राजकीय पदाधिकाऱ्यांच्या अनधिकृत बांधकामांना अभय दिले जात असल्याचे चित्र आहे. भोसरीमध्ये देखील नगरसेविका भीमा पोपट फुगे यांच्या पतीच्या नावावर असलेल्या इमारतीचे बांधकाम अनधिकृतपणे केले आहे.
पुणे – नाशिक महामार्गावर उड्डाणपुलाखाली शिवगंगा कॉम्प्लेक्स या इमारतीचे वरच्या मजल्याचे बांधकाम अनधिकृतपणे वाढविण्यात आले आहे. त्याची कोणतीच परवानगी महापालिकेकडून घेण्यात आलेली नाही. तसेच वाढीव इमारतीच्या बांधकामाची माहिती महापालिकेला दिली नाही. वाढीव बांधकाम करूनही या ठिकाणी महापालिकेचा पाणीपुरवठा होत आहे. वीज पुरवठा देखील होत आहे.
मात्र याची माहिती महापालिकेपासून लपवली आहे. खाली असणाऱ्या बांधकामाची नोंद आहे. मात्र विविध कराचे लाखो रुपये त्यांनी महापालिकेला दिलेले नाही. महापालिकेचा लाखो रुपयांचा कर बुडाल्याने हि नागरिकांची देखील फसवणुक आहे. सर्वसामान्य लोकांवर कारवाई होत असताना लोकप्रतिनिधीना अभय का असा सवाल अनिल फुगे यांनी उपस्थित केला.
महापालिकेची फसवणुक केल्याप्रकरणी भीमा फुगे यांचे नगरसेवक पद रद्द करावे. अशी मागणी अनिल फुगे यांनी केली. तसेच महापालिकेला फसविल्याप्रकरणी नगरसेविका भीमा फुगे यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल फुगे यांनी केली. अन्यथा त्या बाबत न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला.
मला निवडणुक लढवायची नाही. मी सामान्य कार्यकर्ता आहे. अशाच प्रकारे भोसरी परिसरात अनेक अनाधिकृत बांधकामे आहेत. अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची कारवाई सध्या सुरू असून अशा बेकायदेशीर व्यावसायिक बांधकामावर कारवाई करून नगरसेवक पद रद्द झाले पाहिजे.
– अनिल फुगे (सामाजिक कार्यकर्ते)






















Join Our Whatsapp Group