पिंपरी (Pclive7.com):- ३२ वा रस्ता सुरक्षा अभियान २०२१ निमित्त रस्ते अपघात प्रतिबंध व वाहतूक नियमांची जनजागृती करण्यासाठी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या प्रमुख उपस्थितीत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय वाहतूक शाखेच्या वतीने जनजागृतीपर वाहतूक दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
सदर वाहतूक जनजागृती दिंडीची सुरुवात सकाळी ११ वाजता फ्रुटवाले धर्मशाळा आळंदी येथून झाली. यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक एनएसएस व इतर सेवाभावी संस्था सहभागी झाल्या होत्या. दिंडीचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांच्या हातात वाहतूक नियमांचे पोस्टर्स व बॅनर्स होते. तसेच जनजागृती रथ, पालखी, बैलगाडी, लेझीम पथक, भजनी मंडळ इत्यादी माध्यमातून वाहतूक नियमांची जनजागृती करण्यात आली. सदरच्या दिंडीचा शेवट फ्रुटवाले धर्मशाळा सभागृह याठिकाणी झाला.
तेथे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय वाहतूक शाखेच्या वतीने घेण्यात आलेल्या वाहतूक विषयक निबंध लेखन, चित्रकला, पोस्टर स्पर्धामधील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत संत साहित्यातील विविध उदाहरणे, दाखले देऊन जनजागृतीपर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांनी वाहतूक शाखेकडून ३२ वा रस्ता सुरक्षा अभियान २०२१ दरम्यान राबविलेल्या कार्यक्रमांची माहिती देऊन, वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास पोलीस उपायुक्त मंचक इप्पर व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आदे, पोलीस निरीक्षक चौधर, पोलीस निरीक्षक साबळे, पोलीस उपनिरीक्षक रिकिबे व इतर पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगांवकर, सचिव अजित वडगांवकर, विश्वस्त प्रकाश काळे, शरदचंद्र पवार कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर थोरात, ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य दिपक मुंगसे, श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक प्रदीप काळे व महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक, प्रतिष्ठित नागरिक आदी उपस्थित होते. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.























Join Our Whatsapp Group