पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपाचे नितीन लांडगे विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार प्रवीण भालेकर यांना लांडगे यांनी पराभूत केले आहे. भाजपाच्या उमेदवाराला १० तर राष्ट्रवादीला ५ मते मिळाली.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्यालयातील स्थायी समितीच्या सभागृहात आज (दि.०५) ही निवडणूक झाली. पुण्यातील नोंदणी व मुद्रांक विभागाचे महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहिले.
महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आहे. स्थायी समितीतील संख्याबळानुसार या निवडणुकीत भाजपाचा विजय निश्चित होता. स्थायी समितीत १६ सदस्य आहेत. यात भाजपचे १०, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४, शिवसेना १ आणि अपक्षांचा एक नगरसेवक आहे.
भाजपचे नितीन लांडगे, रवी लांडगे, सुरेश भोईर, शत्रुघ्न काटे, शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, अभिषेक बारणे, सुवर्णा बुर्डे, भीमाबाई फुगे, भाजप संलग्न नीता पाडाळे, राष्ट्रवादीच्या पोर्णिमा सोनवणे, सुलक्षणा धर, राजू बनसोडे, प्रवीण भालेकर आणि शिवसेनेच्या मीनल यादव असे १६ सदस्य स्थायी समितीत आहेत.
व्हिप बजावूनही रवी लांडगे गैरहजर
भाजपाने उमेदवारी नाकारल्यामुळे रवी लांडगे नाराज होते. त्यांनी त्यांच्या स्थायीच्या सदस्यत्वाचा राजीनामा महापौरांकडे दिला होता. मात्र भाजपाने अद्यापही त्यांचा राजीनामा स्विकारला नव्हता. आज निवडणुकीपूर्वी भाजपाचे पक्षनेता नामदेव ढाके यांनी सर्व सदस्यांना व्हिप बजावला होता. मात्र रवी लांडगे निवडणुकीला गैरहजर राहिले होते. त्यामुळे पक्ष आता त्यांच्यावर काय कारवाई करणार हे पहावे लागणार आहे.






















Join Our Whatsapp Group