पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील लिनिअर गार्डनची दुर्दशा होत चालली आहे. या गार्डनमध्ये सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी. तसेच वेळेचे निर्बंध घालावे अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे.
यासंदर्भात महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात नाना काटे यांनी म्हटले आहे की, प्रभाग क्र.२८ पिंपळे सौदागर येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ११ कोटी रुपये खर्चून शहरास शोभेल असे लिनिअर गार्डन तयार केलेले आहे. सदर गार्डन महापालिकेने ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले, नागरिक याच्यासाठी बनवले आहे. महापालिकेच्या व अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे सदर गार्डनचे काही काम सध्यस्थीतीत अपूर्ण अवस्थेत आहे.
परंतु महापालिका प्रशासन, स्मार्ट सिटी, पोलीस यांच्या दुर्लक्षामुळे लिनियर गार्डनची अवस्था दयनीय झाली आहे. या गार्डनमध्ये नागरिकान ऐवजी टवाळखोर व प्रेमीयुगल यांचा वावर वाढला आहे. या गार्डनमध्ये प्रवेश करण्यासाठी चार ठिकाणी प्रवेशद्वार ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे उपद्रव करणारे कुठूनही प्रवेश करतात. त्यांना रोखण्यास गार्डनमध्ये कोठेही पालिका अथवा पोलीसा तर्फे सुरक्षा व्यवस्था नाही. तसेच इथे बसणारे जोडपी व टवाळखोर मुले -मुली अशशील कृत्य करतात. त्याच्यामुळे गार्डन मध्ये फिरण्यास अथवा व्यायाम करण्यास येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास होत आहे.
दोन दिवसापूर्वी या गार्डनमध्ये मुले मुली कराटेचा सराव करत असताना काही टवाळखोर मुले त्रास देत होती. त्यांना त्यांच्या प्रशिक्षकाने हटकले असता त्या मुलांनी त्या प्रशिक्षकाला मारहाण केली. याचा पोलीस दप्तरी गुन्हा नोंद झाला आहे. त्यांनी सराव करत असलेल्या मुलांवर दगडफेक केली असता त्यात एक मुलगी गंभीरपणे जखमी झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
यामुळे स्थानिक नागरिक या गार्डनमध्ये येण्यास घाबरत आहेत. हे असेच वातावरण राहिल्यास हे गार्डन टवाळखोरांचा अड्डा बनेल. तर अश्याने महापालिकेचे ११ कोटी रुपये पाण्यात जातील. ही गंभीर बाब लक्षात घेता भविष्यात लिनियर गार्डनमध्ये प्रवेशाच्या वेळा निश्चित करून पोलिसांच्या मदतीने सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा तैनात करावी व योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्या. तसेच गार्डनमध्ये येण्यास एकच प्रवेशद्वार करून शुल्क आकारले जावे, अशी मागणी नाना काटे यांनी केली आहे.



















Join Our Whatsapp Group