पुणे (Pclive7.com):- पुण्यातील कोरोना स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषद घेत पुणे जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केल्याची माहिती दिली. पुण्यात पुढील सात दिवस अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आलाय. पुण्यातील शहर बस वाहतूक, धार्मिक स्थळं, हॉटेल सेवा पुढील सात दिवसांसाठी बंद राहणार आहे. मात्र, बस आणि हॉटेल्स बंद ठेवण्याच्या निर्णयाला भाजपनं तीव्र विरोध दर्शवला आहे.
भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी पत्रकार परिषद घेत भाजपची भुमिका मांडली. पुण्यात जे नव्याने निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यातील दोन-तीन गोष्टींना विरोध असल्याचं बापट यांनी सांगितलं. पोलिसांनी कायदा घातात घेऊ नये. विनाकारण बाहेर फिरणाऱ्या लोकांवर लाठीमार न करता थेट गुन्हे दाखल करा, अशी मागणी बापट यांनी केलीय. पीएमपीएमल बस बंद करण्यासही भाजपने विरोध दर्शवलाय.
बस बंद झाली तर कामगार वर्ग प्रवास कसा करणार? असा प्रश्न विचारतानाच ४० टक्के क्षमतेनं पीएमपीएमएल बस सुरु ठेवण्याची मागणी बापट यांनी केलीय. हॉटेल्स पूर्ण क्षमतेनं बंद न करता उभे राहून खाण्यास परवानगी द्या अशी मागणी भाजपनं केलीय. संचारबंदी नको तर जमावबंदी असावी अशी भूमिका भाजपने मांडली आहे.
पोलिसांनी दक्षता समिती, सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घ्यावी. शिस्त पाळून समाजजीवन सुरु राहायला हवं. लोकांना रेशन द्या. काही द्यायचं नाही आणि नियम लावायचे याला अर्थ नाही, अशी टीकाही गिरीश बापट यांनी केलीय. तसेच संध्याकाळी ६ वाजेपासून सुरु होणाऱ्या संचारबंदीला विरोध करताना रात्री ८ पासून संचारबंदी करा, अशी मागणीही गिरीष बापट यांनी केली आहे.






















Join Our Whatsapp Group