पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात १८ वर्षा पुढील वयोगटातील नागरिकांचे लसीकरण चालू करावे अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे. काटे यांनी यासंदर्भातील मागणीचे पत्र आज (दि.३१) महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिले आहे.
नाना काटे यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी वय वर्षे ४५ पुढील नागरिकांसाठी ६५ केंद्रावर लसीकरण चालू आहे. या सर्व लसीकरण केंद्रावर वय वर्षे ४५ पुढील (८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत) लस घेणाऱ्या नागरिकांची संख्या कमी होत चालली आहे. यामुळे लसीकरण कमी होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे शासनाने दिलेल्या मर्यादेमुळे अनेक ४५ वर्ष पुढील नागरिकांसाठी लस न घेता परत जात आहे.
यामुळे शहरात अधिकाधिक लसीकरण करण्यासाठी १ जुन पासून आपल्या पिंपरी चिंचवड शहरात वय वर्षे १८ पुढील नागरिकांचे लसीकरण चालू करण्यात यावे. त्यांची ऑनलाइन नोंदणी न करता केंद्रावरच नोंदणी करून लसीकरण करण्यात यावे. पिंपरी चिंचवड शहरात युवकांची संख्या जास्त असून अनेक महाविद्यालय, कंपनी, खासगी ऑफिस इत्यादी ठिकाणी काही काम करणाऱ्या युवकांची संख्या जास्त असून करोनाच्या रोगापासून वाचण्यासाठी या गटातील लसीकरण होणे गरजेचे आहे.
तरी आयुक्तांनी लसीची उपलब्धता व नियोजन बघून त्यांच्या अधिकारात निर्णय घेवून १ जून २०२१ पासून शहरात वय वर्षे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण चालू करण्याचे आदेश द्यावेत असे नाना काटे यांनी म्हटले आहे.





















Join Our Whatsapp Group