पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने लपून बसलेल्या चोरट्याला हटकल्याने चोरट्याने सिमेंटचा गट्टू भिरकावत गंभीर जखमी केले आहे. ही घटना आज पहाटे तीनच्या सुमारास सांगवी फाटा परिसरात घडली आहे. अमोल लावंड असे जखमी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांच्या भुवईला गंभीर जखम झाली आहे. अमोल यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती सांगवी पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे तीन च्या सुमारास अमोल लावंड आणि कल्याण भोसले हे ड्युटीवर त्यांचं कर्तव्य बजावत होते. तेव्हा, त्यांना मधूबन सोसायटी येथे चोर शिरल्याची स्थानिक फोन पोलीस ठाण्यातून मिळाली. त्यानुसार ते चारचाकीतून निघाले होते.
दरम्यान, घोलप महाविद्यालयाच्या मुख्य रस्त्यावर येताच त्यांना दोन चोर लपून बसलेल्याचं दिसलं. अमोल यांनी चारचाकी त्यांच्या जवळ नेऊन कोण आहात, काय करताय असे हटकले असता त्यापैकी एकाने लावंड यांच्या दिशने सिमेंटचा गट्टू भिरकावला तो थेट त्यांच्या भुवईवर लागला.
या हल्ल्यामध्ये अमोल गंभीर जखमी झाले आहेत. अमोल यांच्यावर हल्ला झाल्याने सहकारी त्यांच्या मदतीसाठी धावले असता या संधीचा फायदा घेत दोन्ही चोरटे पळून गेले. त्यानंतर, लावंड यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यासंदर्भातील अधिक तपास सांगवी पोलीस करत आहेत. घटना घडली त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही पोलीस तपासणार आहेत.






















Join Our Whatsapp Group