पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण ‘पीएमआरडीए’मध्ये विलीन करण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. यामुळे खऱ्या अर्थाने नवनगर विकास प्राधिकरणाचे अस्तित्व संपुष्टात आले. या अन्यायकारक निर्णयामुळे पिंपरी चिंचवडकरांचे खूप मोठे भरुन न येणारे नुकसान होणार असल्याची टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी केली आहे.
याबाबत अमित गोरखे म्हणाले, या निर्णयाला पहिल्याच दिवशी भारतीय जनता पार्टीने विरोध केला होता. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच सर्व संबंधित मंत्री महोदय यांना पत्रव्यवहार केला होता. खासदार-आमदार हे लोकप्रतिनिधी जनतेने मोठ्या विश्वासाने निवडून दिलेले असतात. राज्य सरकारने हा निर्णय घेताना तसेच नियमावली जाहीर करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेणे गरजेचे होते. परंतू, असा कोणताही पर्याय न अवलंबता प्राधिकरण विलीन करण्याचा शासन निर्णण जारी करण्यात आला.
पुणे शहराच्या हद्दीबाहेर पिंपरी-चिंचवड परिसरात औद्योगिक विकास झपाट्याने होत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड परिसरातील जमीन संपादन करणे, संपादित केलेल्या जमिनीचा नियोजनबद्ध आणि सर्वांगिण विकास करणे, विकसित झालेले भूखंड गरजेनुसार निवासी, शैक्षणिक, औद्योगिक, वाणिज्य व सामाजिक कारणांसाठी उपलब्ध करून देणे, हे मुख्य उद्देश मार्गी लावणे औद्योगिक दृष्ट्या महत्वाचे ठरू लागले.
त्यामुळे कामगारांना कारखान्याजवळ निवासाची सोय व्हावी, अशी मागणी जोर धरु लागली होती. याच पार्श्वभूमीवर पुणे महानगर प्रादेशिक योजनांच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1996 च्या कलम 113 (2) अन्वये 14 मार्च 1972 रोजी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली होती, असे अमित गोरखे यांनी म्हटले आहे.






















Join Our Whatsapp Group