पिंपरी (Pclive7.com):- गरिबों के सन्मान मै.. राष्ट्रवादी मैदान मै.., दहा रूपयांचा चहा अन् वीस रूपयांचे पार्किंग.., धिक्कार असो.. धिक्कार असो.. सत्ताधारी भाजपाचा धिक्कार असो.. अशा घोषणा करत भाजपाने शहरात सुरू केलेल्या ‘पे अँड पार्क’ धोरणाचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला.
पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महापालिकेच्या प्रवेशव्दारा समोर हे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, माजी आमदार विलास लांडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले.
यावेळी राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक अजित गव्हाणे, मयूर कलाटे, विक्रांत लांडे, पंकज भालेकर, नगरसेविका निकीता कदम, सुलक्षणा शिलवंत-धर, प्रज्ञा खानोलकर, माजी नगरसेवक चंद्रकात वाळके, युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा जगताप, युवकचे शाम जगताप, कुणाल थोपटे, चेतन फेंगसे, अमित लांडगे, संतोष वाघेरे आदी उपस्थित होते.
विलास लांडे म्हणाले की, कोरोनामुळे जनतेवर आर्थिक संकट आहे. नागरिकांच्या खिश्यावर डल्ला मारायचा उद्योग भाजपाकडून सुरू आहे. जनता कर भरते, त्यांच्या खिश्यात हात घातला तर रस्त्यावर उतरू.. उद्या महापालिका विकायचे टेंडर काढतील. प्रत्येक कामात भाजपाच्या नेत्यांची भागिदारी आहे. राष्ट्रवादीने हे शहर घडविले आहे. कधीच चुकीचं काम केलं नाही. ज्या-ज्या ठिकाणी ‘पे अँड पार्क’ आहे त्याठिकाणी नागरिकांनी एकही रूपया भरू नये असे आवाहन लांडे यांनी केले.
संजोग वाघेरे पाटील म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या खिश्याला कात्री लावण्याचं पाप सत्ताधारी भाजपा करत आहे. कोरोनाच्या संकटात नागरिकांचे एकीकडे कंबरडे मोडले असताना पे अँड पार्कच्या नावाखाली पैसे उकळण्याचा धंदा सुरू आहे. सत्ताधारी स्वत:चे खिशे भरण्याचे काम करत आहे. शहरातील ही पॉलिसी तातडीने रद्द करावी अन्यथा राष्ट्रवादी तीव्र आंदोलन करेल असा इशारा वाघेरे पाटील यांनी दिलायं.
विशाल वाकडकर म्हणाले की, सत्ताधारी भाजपच्या पदाधिकार्यांनी आर्थिक फायद्यासाठी हा निर्णय जनतेवर लादला आहे. भाजपाने तातडीने हा निर्णय रद्द करावा अन्यथा राष्ट्रवादी युवकच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.






















Join Our Whatsapp Group