– संदेश पुजारी –
पिंपरी (Pclive7.com):- मैत्री, दोस्ती, यारी, जिगरा… निःस्वार्थी आणि रक्तापलिकडील या नात्याची अशी कित्येक नावं आहेत. सुख-दुःखाच्या क्षणांमध्ये कायम सोबत असतात ते म्हणजे आपले मित्र. करिअर, जबाबदारी आणि राजकारणामुळे ‘मैत्रीचं नातं’ दुरावलं जातं. मात्र राजकीय पक्ष कोणताही असो मैत्री कशी असावी याचं उत्तम उदाहरण आज पिंपरी चिंचवडकरांसमोर आलं आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचेे महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, भाजपाचे दक्षिण भारतीय आघाडीचे अध्यक्ष राजेश पिल्ले, माजी नगरसेवक उल्हास शेट्टी, शांताराम भालेकर हे सर्व जुने मित्र आज मैत्री दिनानिमित्त एकत्र आले होते.
आज १ ऑगस्ट या दिवशी जगभरात ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला जात आहे. मित्र-मैत्रिणींना भेटून हा दिवस साजरा करणं शक्य नसेल तर त्यांना मेसेज पाठवून तुमच्या मैत्रीच्या नात्यातील आठवणी ताज्या केल्या जातात.
‘फ्रेंडशिप डे’चं औचित्य साधत पिंपरी चिंचवड मधील हे राजकीय नेते एकत्र आले होते. आमदार महेश लांडगे, राजू मिसाळ, प्रशांत शितोळे, राजेश पिल्ले, उल्हास शेट्टी, शांताराम भालेकर हे सर्व जुने मित्र आहेत. पुर्वी सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. मात्र राजकीय उलथापालथ झाल्याने महेश लांडगे, राजेश पिल्ले, शांताराम भालेकर यांनी भाजपाची वाट धरली. आज पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता आहे. तर राष्ट्रवादी विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे.
आगामी महापालिका काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे पुढील काळात सत्तेसाठी भाजपा आणि राष्ट्रवादीत संघर्ष अटळ आहे. आरोप-प्रत्यारोप, टिका-टिप्पणीचा सामना रंगणार आहे. त्यावेळी या जुन्या मित्रांना आपली मैत्री विसरून एकमेकांवर हल्लाबोल करावा लागणार आहे. त्यामुळेच राजकीय जोडे बाजूला ठेवून या मंडळींनी आज ‘फ्रेंडशिप डे’चे औचित्य साधत एकत्र येऊन सेलिब्रेशन केले. यावेळी ‘चाय पे चर्चा’ करत जुन्या आठवणींना उजाळाही दिला.
या नेते मंडळीच्या या ‘फ्रेंडशिप डे’ सेलिब्रेशनचे फोटो सोशलमिडीयावर व्हायरल झाले असून या ‘अतुट’ मैत्रीबद्दल कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.