पिंपरी (Pclive7.com):- ऑगस्ट क्रांतिदिनाचे औचित्य साधून शब्दधन काव्यमंचाने क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मृतिसमाधीजवळ रविवार, दिनांक ०८ ऑगस्ट २०२१ रोजी जुना पुणे-मुंबई हमरस्ता, वाकडेवाडी येथे क्रांती कविसंमेलनाचे आयोजन केले होते. ज्येष्ठ साहित्यिक नंदकुमार मुरडे, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, समरसता साहित्य परिषद (पिंपरी-चिंचवड शाखा) अध्यक्ष शोभा जोशी, उद्योजिका ऊर्मिला पाटील, क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे राष्ट्रीय स्मारक समितीचे अध्यक्ष अशोक लोखंडे, सचिव रामदास साळवे, मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, शब्दधन काव्यमंचाचे संस्थापक सुरेश कंक यांची प्रमुख उपस्थिती होती.
लहुजी वस्ताद यांच्या स्मृतिसमाधीवर पुष्पांजली अर्पण करून आणि क्रांतिमशाल प्रज्वलित करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. कुमारी सानिका जोशी या विद्यार्थ्यिनीने लहुजी वस्ताद यांच्यावरील पोवाड्याचे दमदार सादरीकरण केले. शामराव सरकाळे यांनी प्रास्ताविक केले; तर सुभाष चव्हाण यांनी ‘क्रांतिकारकाचा आत्मयज्ञ’ या व्याख्यानातून लहुजी वस्ताद साळवे यांचा जीवनपट उलगडला.
त्यानंतर क्रांती कविसंमेलनात सुरेश कंक, आय.के.शेख, निशिकांत गुमास्ते, तानाजी एकोंडे, कैलास भैरट, फुलवती जगताप, शरद शेजवळ, आत्माराम हारे, अरुण कांबळे, सुभाष शहा, राजू जाधव या कवींनी देशभक्तिपर आणि सामाजिक आशयाच्या कवितांचे प्रभावी सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
नंदकुमार मुरडे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, “क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांनी आपल्या तालमीत अनेक क्रांतिकारक घडविले. मनगटाच्या ताकदीमधूनच क्रांती घडू शकते, याची जाणीव नव्या पिढीने ठेवावी!” असे विचार मांडले.
पंकज पाटील, संगीता जोगदंड, दीपक वायाळ, सचिन लोखंडे, दादा ससाणे, उमेश शिंदे यांनी कार्यक्रमाच्या संयोजनात परिश्रम घेतले. आण्णा जोगदंड यांनी कपड्यावर भारतमाता की जय, वंदेमातरम, जय लहुजी असे लिहून जनजागृती केली. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. मुरलीधर दळवी यांनी आभार मानले. सामुदायिक वंदे मातरम् आणि देशभक्तिपर घोषणांनी कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.























Join Our Whatsapp Group